क्राईम

खताच्या गोण्यांआड गुटख्याचा काळा खेळ!शिरगाव पोलिसांचा गुटखा तस्करांना दणका: ७९ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त, चालक अटकेत


खताच्या गोण्यांआड गुटख्याचा काळा खेळ!शिरगाव पोलिसांचा गुटखा तस्करांना दणका: ७९ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त, चालक अटकेत

 

शिरगाव(मावळ) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची आंतरराज्यीय पातळीवर सुरू असलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत शिरगाव-परंदवडी पोलिसांनी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई केली. नवीन उर्से टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी व्हर्मी कम्पोस्ट खताच्या गोण्यांआड लपवून नेला जाणारा रजनीगंधा गुटखा व सुगंधी तुळशी तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत गुटखा, तंबाखू, खत आणि आयशर टेम्पोसह तब्बल ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना पुण्याहून मुंबईच्या दिशेने एका आयशर टेम्पोतून प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. नवीन उर्से टोलनाक्याजवळ संशयास्पद लाल रंगाचा आयशर टेम्पो (KA 52-C-6756)दिसताच पोलिसांनी तो अडवून झडती घेतली.

चालकाने टेम्पोत व्हर्मी कम्पोस्ट खत असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला. टेम्पोच्या मागील बाजूस खताच्या गोण्यांआड लपवलेले बॉक्स उघडताच ४२ लाख ४३ हजार २०० रुपयांचा रजनीगंधा गुटखा आणि १४ लाख ४० हजार रुपयांची सुगंधी तुळशी तंबाखू आढळून आली. तसेच २ लाख ६३ हजार १२० रुपयांचे व्हर्मी कम्पोस्ट खत आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अमजदुद्दीन ऐनुलहक चौधरी, रा. माखली, बंगळुरू, कर्नाटक, मूळ रा. त्रिपुरा, याला अटक करण्यात आली आहे. शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलिस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.

खताच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शिरगाव पोलिसांनी हाणून पाडल्याने गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *