कामशेतच्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाची वाट कचऱ्याने अडवली ग्रामपंचायतीच्या कारभारावर संतापाचा भडका
कामशेतच्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाची वाट कचऱ्याने अडवली ग्रामपंचायतीच्या कारभारावर संतापाचा भडका
कामशेत : कामशेत शहरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेल्या कचऱ्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या या कब्रस्थानाच्या मार्गावर शहरातील कचरा आणून टाकला जात असल्याची तक्रार असून, यामुळे धार्मिक स्थळाच्या परिसराचे पावित्र्य आणि नागरिकांच्या भावनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कब्रस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिकांकडून तसेच प्रवाशांकडूनही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीकडून शहरातून संकलित होणारा कचरा याच परिसरात आणून टाकला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे स्वच्छ कामशेतचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते कमरूद्दीन शेख यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, कब्रस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा टाकणे तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांकडून जबाबदारीची अपेक्षा केली जाते; मग ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे. कब्रस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरच कचऱ्याचे ढीग पडत असतील, तर स्वच्छतेचे नियोजन नेमके कुठे केले जाते, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीने या ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि संकलित कचऱ्याची विल्हेवाट अधिकृत ठिकाणीच लावावी, अशी मागणी होत आहे.





