श्री पोटोबा महाराज मंदिराच्या मागे अनोळखी तरुणाचा मृतदेह; वडगाव मावळमध्ये खळबळ
श्री पोटोबा महाराज मंदिराच्या मागे अनोळखी तरुणाचा मृतदेह; वडगाव मावळमध्ये खळबळ
वडगाव मावळ :
शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराज मंदिराच्या पाठीमागील परिसरात शनिवारी (दि. १० जानेवारी) सकाळी एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मंदिराचे पुजारी अशोक शंकर गुरव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नेहमीप्रमाणे मंदिर परिसराची पाहणी करत असताना मंदिराच्या मागील बाजूस संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ वडगाव मावळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत तरुणाच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट तसेच राखाडी रंगाचे जॅकेट आढळून आले आहे. उजव्या हाताच्या बोटात स्टीलच्या अंगठ्या असून फ्रेंच कट दाढी वाढलेली आहे. तसेच डाव्या पायाच्या पोटरीवर गोंदण (टॅटू) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ननावरे करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या वर्णनाशी जुळणारा कोणताही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा मृत व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास तात्काळ वडगाव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





