राजकीयसामाजिक

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज अंतिम दिवसाची गर्दी टाळा; शांत, पारदर्शक निवडणुकीचे आवाहन


जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

अंतिम दिवसाची गर्दी टाळा; शांत, पारदर्शक निवडणुकीचे आवाहन

 

वडगाव मावळ:

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे स्पष्ट आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करत शांततेत व सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया, नियम, आचारसंहिता तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गुरुवारी वडगाव मावळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पंचायत समिती अधिकारी कविता पाटील, संताजी जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, अभिमन्यू शिंदे, दत्तात्रेय माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामदास वाडेकर, काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. खंडुजी तिकोणे, विशाल वाळुंज, शिवसेनेचे युवक अध्यक्ष विशाल हुलावळे, संघटक मदन शेडगे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष संदीप कदम आदी मान्यवरांनी बैठकीस उपस्थिती लावली.

 

प्रांताधिकारी नवले म्हणाले की, मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. १६) पासून सुरू होत असून २१ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असल्याने अर्जांची तपासणी करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केल्यास त्यामध्ये काही त्रुटी असल्यास वेळेत दुरुस्तीची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

एका उमेदवारास जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील व प्रत्येक अर्जासाठी वेगळा सूचक असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात स्वीकारले जाणार असून अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ चार व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

उमेदवारी अर्जासोबत शौचालय वापराबाबतचे, अपत्यांची संख्या, चारित्र्य प्रमाणपत्र आदी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी अर्ज जोडणे आवश्यक आहे. शपथपत्रे स्टँप पेपरवर देण्याची गरज नसून नोटरी केलेली शपथपत्रे ग्राह्य धरली जातील, अशी माहिती देण्यात आली.

 

राजकीय पक्षांचा एबी फॉर्म २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार असून उमेदवारांना आवश्यक परवाने मिळावेत यासाठी तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदार याद्या प्रत्येक पानासाठी दोन रुपये शुल्क आकारून उपलब्ध करून दिल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

  • एकूणच येत्या निवडणुका पारदर्शक, शांततापूर्ण व लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून राजकीय पक्ष व उमेदवारांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *