आरोग्य

मावळ–मुळशीतील मंदिर सेवकांसाठी महासेवा शिबिर


मावळ–मुळशीतील मंदिर सेवकांसाठी महासेवा शिबिर

 

कार्ला(मावळ)

मावळ व मुळशी तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा कणा असलेल्या मंदिर व्यवस्थेतील सेवकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम येत्या माघ शु. त्रयोदशी, शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद, मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम व श्री ट्रस्ट, कार्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महासेवा शिबीर आयोजित करण्यात येत असून, या शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व मंदिरांतील पुजारी, पुरोहित, मंदिर विश्वस्त तसेच मंदिर व्यवस्थापक यांचे एकत्रिकरण होणार आहे.

 

सदर शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री ट्रस्ट, श्री दुर्ग परमेश्वरी मंदिर, कार्ला (मुंबई–पुणे जुना महामार्ग) येथे संपन्न होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिर सेवकांचे संघटन बळकट करणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देणे हा आहे.

 

महासेवा शिबिरास H.B.P. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर (मानद अध्यक्ष, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू) यांचे शुभाशीर्वाद लाभणार असून, अजय शिराळी (प्रमुख व्यवस्थापक, श्री ट्रस्ट कार्ला) आणि सुरेश साखवळकर (अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ मावळ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात धार्मिक व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी संजय मुरदाळे (मुंबई क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील.

 

या शिबिरात सहभागी होणाऱ्या पुजारी-पुरोहितांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, दैनंदिन सेवेत व्यस्त असलेल्या मंदिर सेवकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना, विमा, निवृत्तीवेतन, आरोग्य सुविधा व इतर लाभांविषयी तज्ज्ञांमार्फत माहिती देण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमादरम्यान दुपारी १ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व उपस्थितांसाठी हा आपुलकीचा व संवादाचा क्षण ठरणार आहे. या उपक्रमास विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम प्रमुख धनाजी रामचंद्र शिंदे, समीर दिवाकर घरोटे (सह-प्रमुख), सोमनाथ किसनराव दाभाडे (पुणे ग्रामीण विभाग मंत्री), अमोल सुरेश पगडे (मावळ-मुळशी जिल्हाध्यक्ष), महेंद्र अरुण असवले (जिल्हा मंत्री), आकाश साहेबराव वारुळे (सहमंत्री) तसेच गोविंद अप्पाराव ऐनापार्थी (जिल्हा मंदिर एवं अर्चक पुरोहित संपर्क आयाम प्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

मंदिर व्यवस्था मजबूत करण्यासाठी, सेवकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांना सामाजिक-शासकीय प्रवाहाशी जोडण्यासाठी हे महासेवा शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *