सामाजिक

संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता दूत दिवस घोषित करा तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांची राज्य सरकारकडे ठाम मागणी


संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता दूत दिवस घोषित करा
तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांची राज्य सरकारकडे ठाम मागणी

तळेगाव दाभाडे : समाजप्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अखंड ध्यास घेणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाला राज्यस्तरावर स्वच्छता दूत दिवस म्हणून घोषित करण्यात यावे, अशी ठाम मागणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील)यांनी राज्य सरकारकडे केली आहे. गाडगेबाबांच्या कार्यातून प्रेरणा घेत स्वच्छतेच्या चळवळीला नवे बळ मिळावे, हा या मागणीमागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना निवेदन सादर करून ही मागणी मांडली. राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध स्वच्छता अभियानांना लोकसहभागाची व्यापक जोड देण्यासाठी संत गाडगेबाबांच्या विचारांचे पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवेदनात म्हटले आहे की, संत गाडगेबाबांनी आयुष्यभर गावोगावी फिरत स्वच्छतेचा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांनी केवळ प्रवचनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष झाडू हातात घेत रस्ते, धर्मशाळा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. समाजमनातील अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांनी कृतीप्रधान संदेश दिला. त्यांच्या जयंतीदिनी राज्यभर शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता शपथ, जनजागृती रॅली, विद्यार्थी सहभाग उपक्रम आणि ग्रामस्तरीय स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

या संदर्भात बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले, संत गाडगेबाबांचा आदर्श केवळ इतिहासापुरता मर्यादित न ठेवता तो कृतीत उतरविण्याची गरज आहे. त्यांच्या जयंतीला स्वच्छता दूत दिवस घोषित झाल्यास प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची वैयक्तिक जबाबदारी जाणवेल.

दरम्यान, हा दिवस अधिकृतरीत्या घोषित झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना नवी प्रेरणा मिळेल आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत दीर्घकालीन बांधिलकी निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तळेगावकरांकडून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *