तळेगाव दाभाडेतील अंतर्गत रस्ते उध्वस्त गुढीपाडव्यापूर्वी डांबरीकरणाची जोरदार मागणी
तळेगाव दाभाडेतील अंतर्गत रस्ते उध्वस्त
गुढीपाडव्यापूर्वी डांबरीकरणाची जोरदार मागणी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे गावभागातील आझाद मित्र मंडळ ते कचरा डेपो रस्ता तसेच भोई आळी परिसरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर थर, उघडी गटारे आणि धुळीचे साम्राज्य यामुळे या परिसरातून प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी रोजची कसरत ठरत आहे. पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका सातत्याने वाढत आहे.
या रस्त्यांवरूनच कचरा डेपोकडे जाणारा मुख्य मार्ग जात असल्याने दिवसभर कचऱ्याच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या गाड्या हेलकावे घेत असून कचरा सांडत असल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत आहे. परिणामी येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे २००८ नंतर या रस्त्यांची कोणतीही ठोस डागडुजी झालेली नसल्याने ओपन गटारांसह संपूर्ण परिसराला बकाल वस्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गुढीपाडव्याला तळेगाव दाभाडे गावाची वार्षिक यात्रा भरत असल्याने या प्रभागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. यात्रेदरम्यान कुस्तीचा आखाडा, बैलगाडा शर्यतीचा घाट तसेच जोडणाऱ्या डीपी रोडवर वाढलेली वाहतूक लक्षात घेता, याच रस्त्यांवरून हजारो नागरिक व वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे उडणारी धूळ, फुफाटे आणि चिखल यांचा प्रचंड त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे तसेच अर्धवट अवस्थेत असलेली भूमिगत गटार व्यवस्था पूर्ण करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक दीपक भेगडे व शोभा परदेशी यांच्याकडे निवेदन देण्यात आले असता, त्यांनी तात्काळ या समस्येची दखल घेत नगरपालिका प्रशासनाला गुढीपाडव्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
याबाबत स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माने म्हणाले, हा रस्ता केवळ गावभागापुरता मर्यादित नसून सोमाटणे ते तळेगाव दाभाडे गावभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाची अवस्था इतकी खराब झाली आहे की रुग्णवाहिका, शाळेची वाहने व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्षात दर्जेदार कामे तातडीने पूर्ण करावीत.
गुढीपाडव्यापूर्वी रस्ते व गटारांची कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आता स्थानिकांना लागून राहिली आहे.





