आरोग्य

नमस्ते दिनानिमित्त स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीला बळ स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी, धनुर्वात लसीकरण:विद्यार्थ्यांकडून माझी वसुंधरा शपथ


नमस्ते दिनानिमित्त स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीला बळ
स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी, धनुर्वात लसीकरण:विद्यार्थ्यांकडून माझी वसुंधरा शपथ

तळेगाव दाभाडे : केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत १४ जुलै रोजी नमस्ते दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबवून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतादूतांच्या आरोग्य संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

सरसेनापती उमाबाई दाभाडे नगरपरिषद कन्या शाळा क्रमांक ४ तसेच डोळसनाथ कॉलनी येथील गणेश मंदिर सभागृहात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६, प्लास्टिक बंदी, होम कंपोस्टिंग, ई-कचरा व्यवस्थापन, ५ आर (Reduce, Reuse, Recycle, Recover, Refuse) तत्त्वे आणि नमस्ते दिवसाचे महत्त्व याविषयी विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा शपथ घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. कार्यक्रमास नगरसेविका सोनाली दरेकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोणे उपस्थित होत्या.

याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे कार्यरत स्वच्छतादूतांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी २ ते ६ या वेळेत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. भारती पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात स्वच्छतादूतांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांची आभा (ABHA) कार्ड नोंदणीही करण्यात आली.

स्वच्छतादूतांनी सुरक्षा साहित्याचा वापर करून सुरक्षितपणे काम करावे आणि त्यांचे जीवनमान अधिक सक्षम व सुलभ व्हावे, या उद्देशाने नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत स्वच्छतादूतांना आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कार्ड वाटप सुरू असून आतापर्यंत १०५ स्वच्छतादूतांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), आरोग्य सभापती निखिल भगत आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग प्रमुख अभिषेक शिंदे, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, दत्तात्रय ढवळे आणि सुनील काळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. नमस्ते दिनाच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याबाबत समाजात सकारात्मक जनजागृती घडवून आणण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *