एक गाव शिवजयंती तळेगाव दाभाडेत ६ मार्च रोजी भव्य शोभायात्रा
एक गाव एक शिवजयंती तळेगाव दाभाडेत ६ मार्च रोजी भव्य शोभायात्रा
तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने एक गाव एक शिवजयंती उपक्रमांतर्गत येत्या शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी तळेगाव दाभाडे येथे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन वद्य तृतीया निमित्त साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात संपूर्ण गाव एकत्र येत छत्रपतींच्या विचारांचा जागर करणार आहे.
उत्सवाची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणातून भव्य शोभायात्रेने होणार असून समारोप श्री शिवशंभू तीर्थ येथे होणार आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात गावातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा मार्गक्रमण करणार आहे.
यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री शिवशंभू तीर्थ ही संकल्पना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दक्षिण दिग्विजय रथाची भव्य प्रतिकृती तसेच श्रीशैलम ज्योतिर्लिंग स्थळाची देखणी मांडणी होय. इतिहासाची सजीव अनुभूती देणाऱ्या या रथातून शिवकालीन पराक्रमाची गाथा उलगडली जाणार असून नागरिकांना प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे.
शोभायात्रेत मावळी ढोल-ताशा पथकाचा दमदार सहभाग असणार आहे. तसेच XN LIGER NX PRO SOUND यांची अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था आणि VIGHNAHARTA LIGHTS यांची आकर्षक रोषणाई सोहळ्याची शोभा वाढविणार आहे. पारंपारिकतेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम यावेळी अनुभवता येणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा सामूहिक प्रयत्न ठरणार आहे.





