कॉलेजच्या नावाखाली टाईमपास संस्कृती’चा फैलाव तळेगावात विद्यार्थ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह
कॉलेजच्या नावाखाली टाईमपास संस्कृती’चा फैलाव तळेगावात विद्यार्थ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह
तळेगाव दाभाडे : शहरातील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या अनुशासनभंगामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडणारे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रत्यक्षात महाविद्यालयात उपस्थित राहत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नाना भालेराव कॉलनी तसेच आनंद नगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर हे विद्यार्थी गटागटाने फिरताना, वेळ घालवताना आणि गप्पांचे फड रंगवताना वारंवार आढळून येत आहेत. काही विद्यार्थी केवळ हजेरी लावून लगेचच कॉलेजच्या बाहेर पडतात आणि उर्वरित वेळ हेच रस्ते त्यांच्या मोकळ्या वेळेचे ठिकाण बनतात.
स्थानिक रहिवाशांच्या मते, दिवसाढवळ्या या भागात विद्यार्थ्यांची गर्दी वाढलेली दिसते. विशेषतः दुपारच्या वेळेत नाना भालेराव कॉलनी आणि आनंद नगरमधील शांत अंतर्गत रस्ते युवकांच्या अड्ड्यांमध्ये रूपांतरित झाल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातील शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, काही विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतरही वेळेत घरी परत न जाता तासन्तास या भागात बसून राहतात. यामुळे पालकांच्या विश्वासाला तडा जात असल्याचेही मत व्यक्त होत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी अतिशय मोकळेपणाने वागत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
हे प्रकार केवळ शिस्तभंगापुरते मर्यादित नसून भविष्यातील पिढीच्या घडणीवर परिणाम करणारे आहेत,असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंद्रायणी महाविद्यालय प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, परिसरात देखरेख वाढवावी तसेच पालकांशी नियमित संपर्क साधून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली ही भटकंती संस्कृती अधिकच बळावण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.





