आरोग्यशहर

मावळ दर्पणच्या वृत्ताचा परिणाम. बनेश्वर स्मशानभूमीतील मंडपाची तात्काळ स्वच्छता


मावळ दर्पणच्या वृत्ताचा परिणाम. बनेश्वर स्मशानभूमीतील मंडपाची तात्काळ स्वच्छता

तळेगाव दाभाडे :
येथील बनेश्वर स्मशानभूमी परिसरातील प्रवचन मंडप व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे वृत्त मावळ दर्पणने ३ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत स्मशानभूमीची व्यवस्था पाहणारे सोपान शांताराम निगडकर यांनी तत्परतेने स्वच्छता मोहीम राबवत दोन्ही मंडप चकाचक केले आहेत.

स्मशानभूमी परिसरातील मंडपाच्या छतावर व कोपऱ्यांमध्ये कोळ्यांची जाळी, धूळ व घाण साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. विशेषतः अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना व नागरिकांना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याची बाब वृत्तातून समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सोपान निगडकर यांनी विलंब न करता आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने संपूर्ण मंडपाची स्वच्छता मोहीम हाती घेतली.

सोपान निगडकर यांनी स्वता आधुनिक मशीन सोबत घेऊन स्मशानभूमीतील दोन्ही मंडप, छत, भिंती व कोपऱ्यांमध्ये साचलेली धूळ व कोळ्यांची जाळी पूर्णपणे हटवली. परिणामी मंडप आता स्वच्छ, नीटनेटका व प्रसन्न दिसत असून परिसरात स्वच्छतेची नवचैतन्यदायी झळाळी निर्माण झाली आहे.

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिकांनी माध्यमांच्या पाठपुराव्याचे स्वागत करत सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी अशा वृत्तांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मावळ दर्पणच्या वृत्तामुळे प्रशासन व संबंधित जबाबदार व्यक्तींनी तातडीने कारवाई केल्याने पत्रकारितेची प्रभावी भूमिका पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *