ताज्या घडामोडी

मावळ दर्पणच्या वृत्ताची उपनगराध्यक्ष गणेश काकडेंकडून तातडीने दखल: फुटलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू


मावळ दर्पणच्या वृत्ताची उपनगराध्यक्ष गणेश काकडेंकडून तातडीने दखल: फुटलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

 

तळेगाव दाभाडे : शहराला पाणीपुरवठा करणारी विजय मारुती खिंड येथील पाइपलाइन फुटल्याचे वृत्त मावळ दर्पण ने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) प्रसिद्ध करताच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या सूचनेनंतर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने फुटलेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे पाण्याची नासाडी रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

गुरुवारी सकाळी साधारण आठच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गालगत विजय मारुती खिंड येथे, मारुती मंदिरासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. पाण्याची नासाडी थांबवून पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या वृत्तातून करण्यात आली होती.

 

शहरात एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे पाणीपुरवठा यंत्रणेतील गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा मावळ दर्पण ने मांडला. या वृत्ताची दखल घेत उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला आवश्यक निर्देश दिले. त्यानंतर संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

 

पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गळतीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक ठरते. या प्रकरणात वृत्ताची दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याबरोबरच स्थानिक पत्रकारितेची भूमिका अधोरेखित झाली आहे.

 

पाइपलाइनच्या दुरुस्तीची तातडीने दखल घेतल्याबद्दल उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून पाण्याची नासाडी कायमस्वरूपी थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *