शिवज्योतींच्या तेजात तळेगाव दाभाडे उजळले. एक गाव–एक शिवजयंती उपक्रमात शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
शिवज्योतींच्या तेजात तळेगाव दाभाडे उजळले. एक गाव–एक शिवजयंती उपक्रमात शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
तळेगाव दाभाडे :
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे शहरात ‘एक गाव–एक शिवजयंती’ या उपक्रमांतर्गत अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती आणि छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उत्सवाने शहरात शिवभक्तीची तेजस्वी प्रभा पसरली.
उत्सवाची सुरुवात सकाळी शिवज्योतींच्या दिमाखदार आगमनाने झाली. शहरातील विविध शिवज्योत मंडळांनी ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योती घेऊन श्री शिवशंभू तीर्थ येथे आगमन केले. शिवप्रेमींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आयोजकांच्या वतीने शिवज्योतींचे स्वागत व अभिवादन करून स्वराज्यस्मृतींचा मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.
यानंतर श्री शिवशंभू तीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तींचा विधिवत अभिषेक व पूजन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे श्री शिवशंभू तीर्थ उभारल्यानंतर प्रथमच हा अभिषेक सोहळा पार पडत असून तो सीआरपीएफचे डीआयजी वैभव निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी शिवरायांच्या शौर्यगाथा आणि स्वराज्याच्या प्रेरणेची उजळणी करण्यात आली.
कार्यक्रमात छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील) यांच्या पुढाकाराने डीआयजी वैभव निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री शिवशंभू शिल्पाची प्रतिकृती देऊन नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सन्मानाला दाद दिली.
या वेळी बोलताना डीआयजी वैभव निंबाळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. स्वराज्य, शौर्य, न्याय आणि सुशासनाची मूल्ये समाजाने आचरणात आणली तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल. तरुण पिढीने शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेत राष्ट्रभक्ती, शिस्त आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा. शिवरायांनी घडवलेले स्वराज्य हे केवळ इतिहास नसून ते प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून देणारे मार्गदर्शन आहे,
सायंकाळी उत्सवाची रंगत आणखी खुलली. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय पाटोळे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला.
या शोभायात्रेत शिवकालीन परंपरेची झलक पाहायला मिळाली. विविध आकर्षक चित्ररथ, पारंपरिक वाद्यांचा निनाद, दणदणीत ढोल-ताशा पथके तसेच तेजस्वी शिवज्योती यामुळे वातावरण शिवमय झाले होते. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
शहरातील विविध शिवप्रेमी मंडळे, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. शहरातून मार्गक्रमण करत ही भव्य शोभायात्रा श्री शिवशंभू तीर्थ येथे दाखल झाली.
कार्यक्रमाचा समारोप नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आला. आकाशात रंगांची उधळण करणाऱ्या आकर्षक रोषणाईने उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. या रोषणाईने शिवजयंती उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती तसेच शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तळेगाव दाभाडे शहरात शिवभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा हा सोहळा उत्साह, ऐक्य आणि स्वराज्याभिमानाचे प्रतीक ठरला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बाविस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले.





