सामाजिक

चिखला घटनेचा तीव्र निषेध अखंड मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन


चिखला घटनेचा तीव्र निषेध अखंड मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन

 

वडगाव (मावळ) : बुलडाणा जिल्ह्यातील चिखला येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अखंड मराठा समाज, मावळ तालुका यांच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी समाजाच्या शिष्टमंडळाने वडगाव मावळ येथे तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

 

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज हा सर्वसमावेशक, सुसंस्कृत व कायद्याचा आदर करणारा समाज म्हणून ओळखला जातो. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि शांततेचा मार्ग स्वीकारत समाजाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र चिखला परिसरात घडलेली घटना ही मानवतेला काळिमा फासणारी असून समाजातील सलोख्याला बाधा आणणारी आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.

 

राज्यकारभार हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित असल्याचे नमूद करत स्त्री-सन्मान, न्याय व सामाजिक समतेचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले. अशा विकृत घटनांना वेळीच आळा घातला नाही तर समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला.

 

घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करावी, कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी अखंड मराठा समाजाने केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

 

या वेळी मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले. प्रशासनाने तातडीने सकारात्मक कारवाई न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला.

 

यावेळी तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्यासह भाऊसाहेब हुलावळे, नरेंद्र मु-हे, विलास येवले, सुनील वाजे, भाऊसाहेब ढोरे, अमोल ढोरे, दत्ता वाजे, निखिल मु-हे, निलेश जगदाळे, संजय पिंजण, विकास घाटोळे, चरण मु-हे, रविंद्र इंगळे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने घटनेचा निषेध नोंदवत प्रशासनाकडून त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *