क्राईम

सोमाटणे फाट्यावर पिस्तूल तस्करीचा भंडाफोड: पोलिसांच्या सापळ्यात तिघे जेरबंद, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त


सोमाटणे फाट्यावर पिस्तूल तस्करीचा भंडाफोड: पोलिसांच्या सापळ्यात तिघे जेरबंद, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे (मावळ) :
पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या अवैध शस्त्रांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या विशेष मोहिमेत सोमाटणे फाटा येथे पिस्तूल तस्करीचा मोठा भंडाफोड करण्यात आला. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने रचलेल्या नियोजनबद्ध सापळ्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चार देशी बनावटीची पिस्टल, सात जिवंत काडतुसे आणि एक आलिशान कार असा एकूण १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून शहरात विशेष गस्त आणि गुप्त माहिती संकलन मोहीम राबविण्यात येत होती. याच दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सरदार सय्यद हा आपल्या साथीदारांसह तळेगाव दाभाडे परिसरातील सोमाटणे फाटा येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोमाटणे फाटा परिसरातील एका निर्जन ठिकाणी १० मार्च २०२६ रोजी सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद हालचाली करत एक मारुती सुझुकी फ्रॉन्स कार तेथे दाखल झाली. पोलिसांनी तत्काळ कारला वेढा घालत त्यातील तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून सुरुवातीला तीन देशी बनावटीची पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली.

दरम्यान, पुढील चौकशीत आरोपी प्रशांत सोनवणे याच्याकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या हाती एकूण चार पिस्टल आणि सात जिवंत काडतुसे लागली. तसेच आरोपी वापरत असलेली आलिशान कारही जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १० लाख ९२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरदार अकबर सय्यद (वय २०, रा. तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (वय ३५, रा. खेड, पुणे) आणि प्रशांत बबुशा सोनवणे (वय २८, रा. चेंबूर, मुंबई) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात या शस्त्रतस्करीचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी सरदार सय्यद याने ही पिस्टले मध्यप्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सदर प्रकरणातील गुरुसिंग हा सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच अटकेत असलेला सरदार सय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी तसेच ‘मोक्का’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर तसेच त्यांच्या पथकाने अचूक माहिती आणि वेगवान कारवाई करत ही टोळी जेरबंद केली.

या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रांच्या तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असून संभाव्य गुन्हेगारी कट उधळण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *