लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोरट्यांना दणका! बांधकाम साईटवरील १६.४० लाखांची लोखंडी चोरी उघड; सहा आरोपी जेरबंद:आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; १५.७१५ टन लोखंडी साहित्य आणि चोरीसाठी वापरलेली तीन वाहने हि जप्त
लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोरट्यांना दणका! बांधकाम साईटवरील १६.४० लाखांची लोखंडी चोरी उघड; सहा आरोपी जेरबंद:आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; १५.७१५ टन लोखंडी साहित्य आणि चोरीसाठी वापरलेली तीन वाहने हि जप्त
लोणावळा | बांधकाम साईटवरील लाखोंच्या लोखंडी साहित्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. वाकसाई येथील धर्मशाळेच्या बांधकाम साईटवरून १६ लाख ४० हजार रुपयांचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीचा तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून १५.७१५ टन लोखंडी साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
बांधकाम साईटवरून लाखोंचा माल लंपास!
वाकसाई (ता. मावळ) येथील गट क्रमांक १९० ए आणि १९०/बीमध्ये पाटण जैन मंडळाच्या धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे. या साईटवर ठेवलेले लोखंडी मुंढवे, सळई आणि पाइप असा १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा माल १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० या कालावधीत चोरीला गेला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीने उघडले चोरीचे धागेदोरे!
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी भूषण माने यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपीचा माग काढला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या गुन्ह्यात सहा जणांचा सहभाग उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन वाहने जप्त; संपूर्ण मुद्देमाल हस्तगत!
या प्रकरणात लाखन मोहन सिंह (उत्तर प्रदेश), मुस्ताक अब्दुल मुरुफ खान (साकीनाका, मुंबई), जमालुउद्दीन करम हुसेन मिनार (कल्याण), निसार मुर्तजा हुसेन (पनवेल) आणि मोहम्मद सफिक मोहम्मद हनिफ खान (भिवंडी) यांच्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी चोरीचे १५.७१५ टन लोखंडी साहित्य हस्तगत केले. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो, पिकअप आणि इनोव्हा कार जप्त केली. त्यामुळे चोरीला गेलेल्या मालाची संपूर्ण वसुली करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक!
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, नाथा केकाण, पोलीस अंमलदार सतीश कुदळे, राहुल खैरे, शुभम सांडभोर, संतोष वाडेकर, गोकुळ खेडकर, अमोल गवारी आणि होमगार्ड अमित भदोरिया यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत.
बांधकाम साईटवरील लाखोंच्या चोरीचा छडा लावून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.





