सामाजिक

धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त तळेगावात मूक पदयात्रा; श्रद्धा आणि त्यागाचा अनोखा आविष्कार


धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त तळेगावात मूक पदयात्रा; श्रद्धा आणि त्यागाचा अनोखा आविष्कार

तळेगाव दाभाडे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तळेगाव शहरात श्रद्धा, शौर्य आणि समर्पणाचा भावपूर्ण संगम अनुभवायला मिळाला. महिनाभर चाललेल्या बलिदान मासाच्या उपक्रमांची सांगता बुधवारी (१८ मार्च) अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात मूक पदयात्रेद्वारे करण्यात आली.

गेल्या महिनाभरापासून श्री शिवशंभू स्मारक येथे दररोज सायंकाळी साडेसात वाजता शिववंदना आणि ‘शिवसूर्य हृदय’ श्लोकांचे पठण करण्यात येत होते. या उपक्रमात समितीचे कार्यकर्ते, महिला आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शहरात सर्वत्र छत्रपती संभाजी महाराजांविषयी अभिमान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होत होती.

बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिर चौकातून मूक पदयात्रेला प्रारंभ झाला. खडक मोहल्ला, गणपती चौक, चावडी चौक, राजवाडा, डोळसनाथ महाराज मंदिर, दाभाडे आळी, शाळा चौक, जिजामाता चौक अशा विविध मार्गांनी ही पदयात्रा शहरातून मार्गक्रमण करत अखेरीस श्री शिवशंभू स्मारक येथे पोहोचली. कधीही न निघालेल्या संभाजी महाराजांच्या अंत्ययात्रेचे प्रतीक म्हणून या मूक पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

स्मारकस्थळी प्रेरणामंत्र आणि शिवसूर्य हृदय श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे आणि रणजीत दाभाडे यांनी उपस्थितांना इतिहासातील प्रेरणादायी पैलूंवर मार्गदर्शन केले.

बलिदान मासाच्या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी वैयक्तिक त्यागाची परंपरा जपत एकवेळ भोजन, पादत्राणांचा त्याग, तसेच मुंडन यांसारख्या कठोर नियमांचे पालन केले. वडू तुळापूर येथून आणलेल्या मशालीने अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले आणि त्यानंतर सामूहिक प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी शिवशंभू समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला आणि बालकांचा सहभाग लक्षणीय ठरला.

तळेगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास साजरा करण्याची परंपरा जपली जात असून, यंदाही ती अधिक उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *