तेराव्या वर्षी धावता शिवभक्त तळेगावच्या साहिल खोंडची १५ किमी ‘शिवज्योत धाव, शहरभर कौतुक
तेराव्या वर्षी धावता शिवभक्त तळेगावच्या साहिल खोंडची १५ किमी ‘शिवज्योत धाव, शहरभर कौतुक
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील कलाप्रेमी व सामाजिक उपक्रमांसाठी ओळख असलेल्या फ्रेंड्स क्लब मंडळातील युवा कार्यकर्ता साहिल सतीश खोंड याने आपल्या जिद्द, श्रद्धा आणि शिवभक्तीची प्रेरणादायी झलक दाखवली आहे. अवघ्या तेराव्या वर्षी साहिलने तळेगाव दाभाडे ते सुवर्णदुर्ग किल्ला या शिवज्योत उपक्रमात सहभागी होत तब्बल १५ किलोमीटर अंतर निरंतर धावत ‘शिवज्योत’ तळेगावात आणण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
शिवज्योत मंडळाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात साहिलने धैर्य, चिकाटी आणि शिवरायांप्रती असलेली निष्ठा यांचे दर्शन घडवले. एवढ्या लहान वयात एवढे मोठे अंतर न थांबता पार करणे हीच त्याच्या जिद्दीची साक्ष ठरली. तळेगाव शहरात आगमन झाल्यावर शिवज्योतीचे स्वागत उत्साहात करण्यात आले.
याचबरोबर ६ मार्च रोजी शिवजयंती निमित्त साहिलने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर व आकर्षक असे चित्र स्वतःच्या हस्ते साकारले. हे चित्र तळेगावातील शिवशंभु तीर्थ येथे भक्तिभावाने अर्पण करण्यात आले. साहिलच्या या कलागुणांमुळे त्याची शिवभक्ती आणि कला यांचा सुंदर संगम शहरवासीयांना अनुभवायला मिळाला.
लहान वयातच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणारा साहिल हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिवरायांप्रती असलेली त्याची श्रद्धा, समज आणि जिद्द येणाऱ्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
साहिल सतीश खोंड यांच्या या उल्लेखनीय कार्याची तळेगाव दाभाडे शहरात सर्वत्र प्रशंसा होत असून नागरिक, सामाजिक संस्था आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





