ताज्या घडामोडीसामाजिक

वडगाव फाटा खडीच्या सापळ्यात. हायवा वाहनांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका


वडगाव फाटा खडीच्या सापळ्यात. हायवा वाहनांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका

 

तळेगाव दाभाडे :

मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील वडगाव फाटा परिसरात अवजड हायवा वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर दगडी खडी रस्त्यावर सांडत असल्याने वाहनचालकांसमोर गंभीर अपघातसंकट उभे राहिले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, परिसरातील नागरिकांनी या स्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

दररोज या मार्गावरून खडी व बांधकाम साहित्य वाहून नेणारी हायवा वाहने मोठ्या संख्येने धावत असतात. मात्र वाहनांवर योग्य झाकण अथवा सुरक्षित बांधणी नसल्यामुळे धावत्या वाहनांतून खडी रस्त्यावर पडत आहे. परिणामी वडगाव फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला व मध्यभागी खडीचा साठा तयार झाला असून तो दुचाकीस्वारांसाठी घातक ठरत आहे.

 

या खडीमुळे अनेक दुचाकीस्वारांचे वाहन घसरून लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटना स्थानिकांकडून सांगितल्या जात आहेत. रस्त्यावर अचानक पडलेल्या खडीमुळे वाहनांचे संतुलन बिघडत असून काही वेळा चारचाकी वाहनांनाही ब्रेक मारताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हा परिसर अक्षरशः अपघातांचा सापळा बनला असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

 

विशेष म्हणजे वडगाव फाटा येथे वाहतूक पोलिसांची चौकी असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी काही वाहनचालकांकडून चिरिमिरी घेण्याकडेच अधिक लक्ष दिले जाते, अशी कुजबुजही परिसरात सुरू आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

दरम्यान, रस्त्यावर साचलेली दगडी खडी तातडीने साफ करण्याची तसेच खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. खडी वाहून नेणाऱ्या वाहनांना योग्य झाकण, जाळी किंवा सुरक्षाव्यवस्था बंधनकारक करण्याचीही मागणी होत आहे.

 

मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील हा मार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेला असल्याने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तात्काळ पावले उचलून खडीसंकट दूर करावे, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *