महत्त्वाचे

विकासाच्या झगमगाटातही नाणे मावळातील महिलांचे लाकडासाठी जंगलभ्रमण


*विकासाच्या झगमगाटातही नाणे मावळातील महिलांचे लाकडासाठी जंगलभ्रमण कायम*

संपादक:गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११
नाणे मावळ : मावळ तालुका हा औद्योगिकरण, शिक्षणसंस्था आणि पायाभूत सुविधांच्या जोरावर प्रगतीकडे झपाट्याने वाटचाल करत असला, तरी या विकासाच्या झगमगाटामागे दडलेले ग्रामीण वास्तव आजही अस्वस्थ करणारे आहे. तालुक्यातील नाणे मावळसह अनेक दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागांमध्ये महिलांचे दैनंदिन जीवन आजही इंधनाच्या शोधात जंगलाशीच बांधलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि गॅस कनेक्शनचा गवगवा असतानाही स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडांसाठी महिलांना रोजच्या रोज जंगलात जावे लागत आहे.

नाणे मावळ, आंबवणे, सुदुंबरे, जांभिवली, शिरगाव, भाजे तसेच पवन मावळ परिसरातील दुर्गम वस्तीतील पहाटेचे दृश्य आजही बदललेले नाही. सूर्य उगवण्याआधीच डोक्यावर रिकाम्या टोपल्या घेऊन जंगलाकडे निघालेल्या महिला, सुकलेली लाकडे गोळा करून जड ओझे डोक्यावर वाहत परतणारे हे चित्र विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अनेक महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतर पायपीट करून जंगलात जावे लागते. रानावनातील काटेरी वाटा, पावसाळ्यातील निसरडे रस्ते, उन्हाळ्यातील अंगाची लाही करणारी गरमी आणि हिवाळ्यातील बोचरी थंडी, कोणत्याही ऋतूत या कष्टांना सुटका नाही.

काही घरांमध्ये गॅस कनेक्शन पोहोचले असले, तरी वाढत्या महागाईमुळे सिलिंडर भरणे अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे गॅस शेगडी घरात असली तरी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचे महिलांनी सांगितले. “गॅस आहे, पण सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत,” अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केली. काही दुर्गम भागांत आजही गॅस कनेक्शन पोहोचलेले नाही, तर काही ठिकाणी वाहतुकीच्या सोयीअभावी सिलिंडर आणणे मोठे आव्हान ठरत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या उज्वला गॅस योजनेसह विविध योजना कागदावर प्रभावी दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात दुर्गम भागांमध्ये त्यांची अंमलबजावणी तोकडी ठरत असल्याचे चित्र आहे. माहितीचा अभाव, आर्थिक अडचणी आणि अपुरी यंत्रणा यामुळे अनेक महिलांना योजनांचा लाभ मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नाणे मावळ व परिसरातील आदिवासी महिलांकडून होत आहे. विकासाची गती वाढत असताना महिलांच्या डोक्यावरील लाकडांचे ओझे मात्र अजूनही कमी झालेले नाही, हेच या वास्तवाचे विदारक सत्य आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *