महत्त्वाचेसामाजिक

तळेगाव दाभाडे येथे लोकसहभागातून बसथांबा:नागरिकांनी दिला प्रशासनाला कृतीचा धडा


तळेगाव दाभाडे येथे लोकसहभागातून बसथांबा:नागरिकांनी दिला प्रशासनाला कृतीचा धडा

तळेगाव दाभाडे : शहरातील स्टेशन परिसरातील अमर हिंद मंडळाजवळ नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून बसथांबा उभारला आहे. शहरातील अनेक भागांत अद्याप बसथांब्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने उन, वारा आणि पावसात बसची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे . या समस्येवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसताना नागरिकांनी पुढाकार घेत उभारलेला हा बसथांबा चर्चेचा विषय ठरला आहे.

निवडणूक काळात शहरातील विविध भागांत आवश्यक त्या ठिकाणी बसथांबे उभारण्याचे आश्वासन आमदार, खासदार तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून देण्यात आले होते. मात्र, आश्वासनांना बराच कालावधी उलटूनही अनेक ठिकाणी बसथांब्यांची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन लोकनिधीतून लोकांसाठी तयार झालेला बसस्टॉप असा आदर्श नागरिकांनी निर्माण केला आहे.

विषय गंभीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष सचिन गजानन देशपांडे यांच्या संकल्पनेतून तसेच जागरूक नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम साकारला. केवळ प्रशासनाच्या आश्वासनांची प्रतीक्षा न करता नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत सार्वजनिक सुविधेची निर्मिती केल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या उपक्रमात मनीष शेळके, जय पवार, सचिन देशपांडे, ऋषिकेश भेगडे, श्रीनिवास राऊत, चंद्रशेखर शिंदे, श्रीनिवास नायडू, निखिल सोनवणे, प्रथमेश जाधव, अर्शद इनामदार, तुषार म्हस्के, दीपक इनामदार, आरती चव्हाण, श्रीकांत गिरी, सचिन लोणकर, राजेश भेगडे, परेश ठोंबरे, संजय खताळ . रमाकांत कुंभार .पवार .यांनी स्वखर्चाने हा बस स्टॉप उभारला आहे

प्रशासनाने आता शहरातील गरजेच्या सर्व ठिकाणी नियोजनबद्ध बसथांबे उभारून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *