शिक्षण-प्रशिक्षण

मावळातील ऑनलाइन छत्रपती संभाजी महाराज चरित्र-जागर स्पर्धेचा निकाल जाहीर


मावळातील ऑनलाइन छत्रपती संभाजी महाराज चरित्र-जागर स्पर्धेचा निकाल जाहीर

तळेगाव दाभाडे : शंभूराजे बलिदान मासाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे इतिहासप्रेमींनी एक अनोखा उपक्रम अनुभवला. डॉ. प्रविण रामभाऊ माने यांनी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करत युट्यूबच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी चरित्रावर आधारित छत्रपती संभाजी महाराज चरित्र जागर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून राज्यभरातून मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध वयोगटातील तसेच विविध क्षेत्रांतील शिवशंभू भक्तांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत शंभूराजेंच्या पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे पैलू आपल्या शब्दांत उलगडले. इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे, अॅड. विनय दाभाडे, डॉ. पुरुषोत्तम चव्हाण आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिनभाऊ शेडगे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत स्पर्धेचे मूल्यमापन केले.

या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, तळेगाव व मावळ परिसरातील एकूण १२ स्पर्धकांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांना प्रत्येकी ५००१ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये कु. प्रणाली माने(कोल्हापुर)श्री. समीर भोसले(कामशेत), अॅड. वसुंधरा देशमुख,(पुणे) श्री. पंजाब येडे पाटील(,पिंपरी चिंचवड) सौ. सपना जाधव,(तळेगाव दाभाडे) सौ. राजश्री मोहिते पाटील(, कोल्हापूर) सौ. कालिंदी कस्पटे(,तळेगाव दाभाडे) कु. अनन्या जाधव,(लोनावळा)कु. शिवम बोराळे(,मावळ) कु. संस्कृती येवले,(लोनावळा) कु. स्वराज्य कोराळे( मावळ) आणि कु. काव्या ठाकूर(तळेगाव दाभाडे) यांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी स्पर्धकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातील विविध अंगांना स्पर्श करत त्यांच्या लढाऊ वृत्तीचा, दूरदृष्टीचा आणि स्वराज्यनिष्ठेचा अभ्यासपूर्ण वेध घेतला. अनेकांनी शंभूराजेंच्या धगधगत्या इतिहासातून प्रेरणा घेत आजच्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान आणि संघर्षमय जीवनकार्याचा प्रचार-प्रसार करणे हा होता. त्यांच्या स्वराज्यरक्षणासाठी आखलेल्या रणनीती, मोहिमा आणि त्यागातून प्रेरणा घेऊन तरुण पिढीने स्वतःच्या आयुष्यात मूल्याधिष्ठित शाश्वत स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प करावा, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.

या अभिनव उपक्रमामुळे इतिहास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *