निर्भय कन्या अभियानातून विद्यार्थिनींना सक्षमीकरणाचा मंत्र सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात तेजस्विनी चोरगे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
निर्भय कन्या अभियानातून विद्यार्थिनींना सक्षमीकरणाचा मंत्र
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात तेजस्विनी चोरगे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. महिलांचे स्वसंरक्षण व सक्षमीकरण या उद्देशाने पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी आदर्श विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य देवकर सर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मुलींनी आत्मविश्वासाने पुढे जात सक्षम नागरिक बनावे, असे आवाहन केले.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. स्वाती पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या तेजस्विनी भरत चोरगे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (RTO), पिंपरी चिंचवड यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत नोकरीपर्यंतचा स्वतःचा संघर्षमय प्रवास त्यांनी कथन केला. वाहतुकीचे नियम, कायदेशीर बाबी आणि महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग राहण्याची गरज यावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्वतःवर विश्वास ठेवा, नियम जाणून घ्या आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जा असा संदेश त्यांनी दिला.
दुसऱ्या व्याख्यात्या डॉ. विनया केसकर (तळेगाव दाभाडे) यांनी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत विद्यार्थिनींना स्वतःला ओळखा, स्वतःवर प्रेम करा हा मंत्र दिला. आत्मविश्वास वाढवणे, स्वतःतील गुण-दोषांची जाणीव ठेवणे, छंद जोपासणे आणि आवश्यक त्या सुधारणा करणे यावर त्यांनी भर दिला. दोन्ही व्याख्यात्यांनी मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत, महत्वाकांक्षी बनावे आणि कर्तृत्वावर आयुष्य घडवावे, अशी प्रेरणादायी शिदोरी दिली.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. माधुरी चंदनशिव यांनीही आत्मनिर्भरतेचे सामाजिक शास्त्रातील महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधवी शेटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. योगिता शिंदे यांनी मानले. समारोप टी.वाय.बी.ए.ची विद्यार्थिनी धनश्री शिंदे हिच्या सुमधुर पसायदान गायनाने झाला.





