युवकांच्या नेतृत्वाला दिशा देणारा उपक्रम : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा नेतृत्व विकास प्रशिक्षण व गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
युवकांच्या नेतृत्वाला दिशा देणारा उपक्रम : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा नेतृत्व विकास प्रशिक्षण व गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच Youth Leadership Training (नेतृत्व विकास प्रशिक्षण) कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रो. डॉ. धनश्री काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाविषयी सखोल व उपयुक्त प्रशिक्षण दिले. अभ्यासक्रमातील छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स देत त्यांनी वेळेचे नियोजन, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि संघभावना यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण घेत असताना समाजोपयोगी उपक्रमांमध्ये कसे सक्रिय सहभाग घेता येतो, विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन व सहकार्य कसे करता येते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाळांमध्ये आयोजित हिमोग्लोबिन तपासणी शिबिरासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांचा समाजसेवेतला सहभाग भविष्यातील सक्षम आरोग्यसेवेची नांदी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन रो. दिपाली शिंदे यांनी केले. त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रभावी व शिस्तबद्ध सूत्रसंचालन रो. प्रशांत ताये यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो. प्रदीप टेकवडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. प्रदीप मुंगसे व रो. राकेश गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रो. दिनेश चिखले, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर यांची आवर्जून उपस्थिती होती.
मार्गदर्शन, गुणगौरव आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला, अशी भावना उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांनी व्यक्त केली.





