तळेगावात करवसुली मोहीम तेजीत; कडक कारवाईसोबत अभय योजने चा दिलासा
तळेगावात करवसुली मोहीम तेजीत; कडक कारवाईसोबत अभय योजने चा दिलासा
तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या करवसुली मोहिमेला सध्या वेग आला असून नियोजनबद्ध उपाययोजना आणि कडक अंमलबजावणीमुळे महसूल वाढीस चालना मिळत आहे. मालमत्ताकराच्या वसुलीत उल्लेखनीय झेप घेत आतापर्यंत १६.६७ कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात आला आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम काटेकोरपणे राबवली जात आहे. नागरिकांनी थकबाकी प्राधान्याने भरून नागरी सेवांना हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
थकबाकीदारांवर दबाव वाढवण्यासाठी जप्ती नोटिसा, मालमत्ता सील करणे आणि पाणीपुरवठा खंडित करणे अशा कठोर उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्याचवेळी ‘अभय योजना’ या सवलतीच्या पर्यायामुळे करदात्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना दंडात्मक व्याजात सवलत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी २४ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून त्यात १२ लिपिक, ६ वॉरंट अधिकारी आणि ६ सहाय्यकांचा समावेश आहे. प्रशासनाच्या या संयुक्त प्रयत्नांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेषतः ‘अभय योजना’मुळे थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात कर भरणा होत आहे.
मोहीम यशस्वी करण्यासाठी नेहा पाटील, प्रसाद गुरव आणि मधुरा जोशी यांनी सक्रिय भूमिका बजावली असून नागरिकांशी थेट संवाद साधत मार्गदर्शन आणि समन्वय साधण्यात ते पुढाकार घेत आहेत.
दरम्यान, डिजिटल सुविधांमुळे करवसुली प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या mahaulb.in या पोर्टलवर मालमत्ताकराची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मालमत्ता क्रमांकाच्या आधारे थकबाकी तपासून तत्काळ भरणा करता येत आहे.
नगर परिषदेकडून कारवाईची धडक मोहीमही सुरू असून चालू वर्षात ४२ मिळकती सील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ प्रकरणांमध्ये थकबाकी भरल्यानंतर सील उठविण्यात आले आहे, तर सध्या ८७ मिळकती सील स्थितीत आहेत.
पाणीपट्टी वसुलीमध्येही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून ९ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ३.९५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. शहरातील १८,३५९ नळजोडांपैकी थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. अनधिकृत जोडांवरही मंगळवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले की, ‘अभय योजना’ अंतर्गत व्याजमाफीचा लाभ घेत नागरिकांनी उर्वरित कर तत्काळ भरावा. नगर परिषदेला सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.





