सामाजिक

इंदोरीतून शंभू-प्रेरणा यात्रा चे प्रस्थान बलिदान मासानिमित्त समाधी दर्शन व शिवव्याख्यानाचा दुहेरी सोहळा


इंदोरीतून शंभू-प्रेरणा यात्रा चे प्रस्थान बलिदान मासानिमित्त समाधी दर्शन व शिवव्याख्यानाचा दुहेरी सोहळा

इंदोरी, : छत्रपतींच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा नव्या पिढीच्या मनामनांत रुजविण्याच्या ध्यासातून इंदोरीतील प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व श्रीक्षेत्र तुळापूर येथे भव्य समाधी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजता इंदोरी येथून शंभू-प्रेरणा यात्रा चे प्रस्थान होणार असून मावळ तालुक्यातील शंभू भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सकाळी ७:०० वाजता यात्रेस प्रारंभ होईल. सकाळी १०:०० वाजता तुळापूर येथे आगमनानंतर पुढील टप्प्यात सकाळी ११:०० वाजता वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल. दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत मयुरी लॉन्स येथे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर १:३० वाजता भोजन समारंभ होणार आहे.

या प्रसंगी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आशुतोष झा यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा अद्वितीय पराक्रम आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान यांचे सखोल विश्लेषण करून युवकांना राष्ट्रभक्तीची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या व्याख्यानातून होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरवर्षी बलिदान मासानिमित्त हा उपक्रम राबविण्यामागे केवळ परंपरा जपणे नव्हे, तर इतिहासाची जाज्वल्य ज्योत पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हा मुख्य हेतू असल्याचे मंचाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मावळ तालुक्यातील शंभू भक्तांसाठी ही यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि प्रेरणा यांचा संगम ठरत आहे.

या संदर्भात बोलताना प्रशांतदादा चंद्रकांत भागवत म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येक युवकाच्या मनात जागी राहावी, यासाठी आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत. या ऐतिहासिक मोहिमेत सर्व शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि इतिहासाशी नाळ घट्ट जोडावी, असे आवाहन त्यांनी केले.

इंदोरीतून निघणारी ही शंभू-प्रेरणा यात्रा पुन्हा एकदा इतिहासस्मृती जागविण्याचे कार्य करणार, यात शंका नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *