ताज्या घडामोडीशहर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

 

 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात शनिवार दि ११ एप्रिल रोजी राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक परिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी, विद्यमान नगरसेविका सौ. आशा अशोक भेगडे तसेच मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या शिक्षणप्रेमी, समतावादी विचारांची आठवण करून देत समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

कार्यक्रमादरम्यान नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक संदीप सोनवणे, जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रसाद गुरव, आरोग्य निरीक्षक सुनील काळकुटे, तसेच दत्तात्रय ढवळे, अनिल इंगळे, संतोष दाभाडे, रुपेश देशमुख, स्वप्निल आढागळे, श्याम गरुड . चंद्रशेखर खंते आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

 

महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षण, शेतकरी हक्क आणि सामाजिक न्यायासाठीच्या कार्याचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या कार्याला वंदन करत त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. नगरपरिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *