तळेगावात बनेश्वर महादेवांचा चंदनउटी सोहळा; एकतारी भजनासह भक्तिमय जल्लोष
तळेगावात बनेश्वर महादेवांचा चंदनउटी सोहळा; एकतारी भजनासह भक्तिमय जल्लोष
तळेगाव दाभाडे :
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, यंदा या सोहळ्याचे २६ वे वर्ष साजरे होत आहे. श्री बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.
रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पारंपरिक चंदनउटी विधी पार पडणार आहे. या वेळी भाविक मोठ्या श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेऊन चंदनउटी अर्पण करतात. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून, त्यानंतर रात्री ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे रात्री ७ ते पहाटे २ वाजेपर्यंत रंगणारा एकतारी भजन कार्यक्रम होय. विविध भजनी मंडळे या कार्यक्रमात सहभागी होणार असून, प्रत्येक मंडळाला तीन भजने सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमणार आहे.
या कार्यक्रमास श्री श्री १००८ महंत पीर योगी रामनाथजी महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महंत ब्रह्मलिंग योगी मोतीनाथजी बाबा व महंत ब्रह्मलिंग योगी महेंद्रनाथजी बाबा यांचे आशीर्वाद लाभणार आहेत.
सोहळ्यास सत्यशीलराजे दाभाडे( सरकार) आमदार सुनील शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे(पाटील) उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे(सरकार) चंद्रसेनराजे दाभाडे (सरकार) सत्येंद्रराजे दाभाडे(सरकार) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
विरोधी पक्षनेते संतोष भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत आहे. इच्छुक भजनी मंडळांनी संयोजकांकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अक्षय तृतीया हा पवित्र व शुभ दिवस मानला जातो. या दिवशी होणाऱ्या चंदनउटी सोहळ्यामुळे तळेगाव परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असून, सामाजिक एकात्मतेलाही बळकटी मिळत आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष भेगडे यांनी केले आहे.





