तळेगाव-चाकण महामार्गावर झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांच्या अभावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
तळेगाव-चाकण महामार्गावर झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांच्या अभावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
तळेगाव दाभाडे : शहरातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण महामार्गावरील वाढत्या वेगवान वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. विशेषतः इंद्रायणी कॉलेज, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, स्त्री शक्ती भाजी मंडई ते वडगाव फाटा रस्त्यालगतचा परिसर हा अत्यंत वर्दळीचा असूनही येथे कुठेही झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
दररोज हजारो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व स्थानिक रहिवासी या मार्गाचा वापर करतात. मात्र, वाहने अत्यंत वेगाने धावत असल्याने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाणे ही मोठी कसरत ठरत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनते. भाजी मंडई परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. समोरून येणाऱ्या वाहनांचे प्रखर दिवे आणि प्रचंड वेग यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्ती चालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते. रस्ता क्रॉस करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे,.अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.
शाळकरी मुलांना तर विशेषतः या समस्येचा सामना करावा लागत आहे. सकाळी शाळेत जाताना व दुपारी परतताना त्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, त्वरित या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारावेत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरे साईड पट्टेही करण्यात यावेत. यासोबतच वेग मर्यादा दर्शवणारे फलक लावणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा, आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





