तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन 2035 चा पाया भक्कम:आमदार सुनील शेळके यांचा शाश्वत, सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप
तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन 2035 चा पाया भक्कम:आमदार सुनील शेळके यांचा शाश्वत, सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन 2035 उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळा व चर्चासत्रात आमदार सुनील शेळके यांनी तळेगावच्या भावी विकासाचा व्यापक आराखडा मांडत शाश्वत, आधुनिक आणि नागरिककेंद्रित शहर उभारणीसाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज अधोरेखित केली.
यावेळी बोलताना त्यांनी तळेगाव हे शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत वेगाने प्रगती करत असल्याचे सांगितले. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि नागरीकरणाचा वेग लक्षात घेऊन 2035 पर्यंतचा दूरदृष्टीचा विकास आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि तज्ज्ञांच्या सहभागातून तयार होणारा हा आराखडा राज्यातील इतर नगरपालिकांसाठीही दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आराखड्यात आंद्रा धरणातून बंदिस्त पाणीपुरवठा, डिजिटल नगरपालिका, स्वच्छ व मुबलक पाणी, एमआयडीसीशी सक्षम जोडणी, नदीकाठ विकास, जॉगिंग ट्रॅक, पर्यटनवृद्धी, अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, वाहतूक कोंडीमुक्ती, हरित क्षेत्रांचा विस्तार आणि महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व उद्योजकांसाठी सर्वसमावेशक नागरी सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यशाळेस तैवानच्या आयसीएचे संचालक लॉरेन्स फिलबुक, शंकर जाधव, अर्चना देशमुख,मुख्याधिकारी गिरीष दापकेकर. नगराध्यक्ष संतोष दाभाडे,(पाटील) उपनगराध्यक्ष गणेश काकडे .विरोधी पक्षनेते संतोष मारुती भेगडे. सत्यशीलराजे दाभाडे (सरकार) वडगाव नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगरसेवक गणेश भेगडे गणेश खांडगे .पत्रकार बांधव. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्रात तळेगावच्या सर्वांगीण, समन्वित आणि भविष्योन्मुख विकासासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.





