महत्त्वाचे

श्री घोरावडेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न


श्री घोरावडेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

शेलारवाडी(मावळ) :वैशाख कृ.१२ प्रदोष गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी श्री घोरावडेश्वर महादेवांचा पारंपरिक चंदन उटी सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा जपत पार पडलेल्या या सोहळ्यास हजारो भाविक, साधू-संत आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शविली.

उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून भगवान शंकरांच्या पिंडीचे संरक्षण व्हावे, या भावनेतून दरवर्षी आयुर्वेदिक चंदन उटीचा लेप लावण्याची प्रथा येथे जपली जाते. घोरावडेश्वरचे पुजारी ब्रह्मीभूत कै. हनुमंत बाबा बोडके यांनी या अनोख्या धार्मिक उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यांची ही परंपरा आजही भक्तांच्या सहकार्याने अखंडपणे सुरू आहे.

काल सायंकाळी विधिवत मंत्रोच्चारात महादेवाच्या पिंडीला सुगंधी आयुर्वेदिक चंदन उटीचा लेप अर्पण करण्यात आला. त्यानंतर मोगरा फुलांच्या दरवळत्या सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी श्री घोरावडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त तथा अध्यक्ष योगी अमरनाथ बाबा यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच ट्रस्टच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत एकतारी भजनाचा सुरेल आणि अध्यात्मिक कार्यक्रम रंगला. भक्तिरस, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम ठरलेल्या या चंदन उटी सोहळ्याने भाविकांच्या मनात श्रद्धेचा गारवा निर्माण केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *