आरोग्य

मावळ दर्पण व सह्याद्री नामा च्या वृत्ताची दखल: संत ज्ञानेश्वर शाळा परिसर अखेर स्वच्छ, आरोग्य विभागाची तातडीची कारवाई


मावळ दर्पण व सह्याद्री नामा च्या वृत्ताची दखल: संत ज्ञानेश्वर शाळा परिसर अखेर स्वच्छ, आरोग्य विभागाची तातडीची कारवाई

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

स्वच्छ शाळेच्या घोषणेला हरताळ संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या परिसरात अस्वच्छतेचा विळखा या मथळ्याखाली मावळ दर्पण आणि सह्याद्री नामा या प्रसारमाध्यमांनी १५ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील वाढलेले गवत काढून साचलेला कचरा हटविण्यात आल्याने विद्यार्थी, पालक .नागरिक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि वाढलेल्या गवतामुळे डास, उंदीर तसेच विषारी कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालक आणि नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कोणताही विलंब न लावता स्वच्छता मोहीम हाती घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

या तातडीच्या कारवाईमुळे शाळेच्या परिसरात स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण झाले असून पालक आणि नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे तसेच उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. लोकहिताच्या प्रश्नांना प्रसारमाध्यमांनी दिलेली वाचा आणि प्रशासनाने त्यावर केलेली त्वरित कार्यवाही ही लोकशाहीतील सकारात्मक समन्वयाची प्रभावी उदाहरण ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *