राव कॉलनीतील गार्डन गवताच्या विळख्यात:उद्यान विभाग झोपेतच? लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनावर नागरिकांचा संताप
राव कॉलनीतील गार्डन गवताच्या विळख्यात:उद्यान विभाग झोपेतच?
लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनावर नागरिकांचा संताप
तळेगाव दाभाडे : शहरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले राव कॉलनी येथील गार्डन सध्या गवत व झाडाझुडपांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी उद्यान विभाग असताना प्रत्यक्ष उद्यानाची ही अवस्था का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, झाडाझुडपांनीही परिसर व्यापला आहे. खेळण्यांच्या परिसरातदेखील गवत वाढल्याने मुलांना खेळण्यासाठी आणणाऱ्या पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वाढलेल्या गवतात साप अथवा इतर सरपटणारे प्राणी लपून बसण्याची शक्यता असल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, उद्यानातील गवत वाढल्याची माहिती उद्यान विभागाला नसावी का? माहिती असूनही साफसफाईकडे दुर्लक्ष का? उद्यान विभाग नेमका जागा आहे की झोपेत? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
नागरिकांच्या करातून उभारलेल्या सार्वजनिक सुविधांची देखभाल करणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, गार्डनची दुरवस्था पाहता प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा केवळ कागदोपत्री कारभारातच रस आहे का, अशी टीका होत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने तातडीने गवत कापणे, झाडाझुडपांची छाटणी, स्वच्छता करून नियमित देखभालीची व्यवस्था करावी. लहान मुलांसाठीचे उद्यान गवताचे जंगल बनण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.





