क्राईम

चेन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश: २७ तोळे सोने जप्त!४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा माग काढत सराईत इराणी आरोपी जेरबंद पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील १५ गुन्हे उघड


चेन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश: २७ तोळे सोने जप्त!४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा माग काढत सराईत इराणी आरोपी जेरबंद पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील १५ गुन्हे उघड

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात चेन चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण केला असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सराईत इराणी चोरट्याला अटक करून चेन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. फिदा हुसैन मानुअली इराणी (वय ३३, रा. महात्मा गांधी वसाहत, इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) याला देहूरोड परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३३ लाख ५३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि पुणे शहरातील दोन, अशा एकूण १५ चेन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले होते. त्यानुसार पोलिस उपआयुक्त, गुन्हे रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे-१ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी पथकाला सूचना दिल्या.

निगडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकाने घटनास्थळ व परिसरातील तब्बल ४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी तपास थेट मुंबईपर्यंत नेला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिदा इराणी व त्याचा साथीदार आदित्य मनलोर यांची ओळख पटली. त्यानंतर फिदा इराणीला ५ सप्टेंबर रोजी देहूरोड परिसरातून अटक करण्यात आली. त्याचा साथीदार मुकेश अरुण बेटके ऊर्फ नेटके (वय ३८, रा. गल्ली क्रमांक २, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यालाही अटक करण्यात आली.

तपासात फिदा इराणीने आदित्य मनलोर आणि कासीम जाफर हुसेन यांच्या साथीने तसेच काही गुन्हे एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे, निगडी, देहूरोड, रावेत, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी तसेच पुणे शहरातील खराडी आणि विश्रामबाग परिसरातील १५ चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिदा इराणी हा मकोकासह पाच गुन्ह्यांत पाहिजे आरोपी होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि चेन चोरीसह गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आदित्य मनलोर सध्या रावेत पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, चेन चोरी व फसवणुकीच्या प्रत्येकी पाच गुन्ह्यांत पाहिजे असलेले तालीब बाबा इराणी (वय २१) आणि अली अब्बास शौकत इराणी (वय २८), दोघेही रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे, यांना ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना यवत पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले.

२०२६ मध्ये ३२ चेन चोरीचे गुन्हे उघड

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून ४८ लाख ८३ हजार रुपये किमतीचे ४१ तोळे सोने जप्त केले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपआयुक्त, गुन्हे रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे-१ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, महेश खांडे तसेच पोलिस अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, प्रविण कांबळे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, गणेश कोकणे, पवन वाजे, गणेश सावंत, विनोद वीर, हर्षद कदम, समिर रासकर, अमर कदम, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, ज्ञानेश्वर कोळगे आणि अशोक मरळ यांनी तपासात सहभाग घेतला.

तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी आणि प्रकाश ननावरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकाच्या सातत्यपूर्ण तपासामुळे चेन चोरीच्या मालिकेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *