क्राईमताज्या घडामोडी

चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार नारायण दाभाडे जेरबंद :13 गंभीर गुन्ह्यांची नोंद, गुन्हे शाखा युनिट-4ची धडाकेबाज कारवाई


चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार नारायण दाभाडे जेरबंद :13 गंभीर गुन्ह्यांची नोंद, गुन्हे शाखा युनिट-4ची धडाकेबाज कारवाई

 

वडगाव (मावळ) : गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरारी असलेल्या आणि तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार नारायण सोपान दाभाडे (वय 41, रा. जांभुळगाव, व्हिजन सिटी, फ्लॅट क्रमांक 304, ता. मावळ, जि. पुणे) याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-4च्या पथकाने शिताफीने जेरबंद केले.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत युनिट-4चे अधिकारी व अंमलदार आरोपींच्या हालचालींचा माग काढत होते. याच तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारामार्फत नारायण दाभाडे याच्याबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

 

उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे गु.र.नं. 596/2023 मधील भादंवि कलम 307, 326.323. 504, 506, 34 अन्वये दाखल गंभीर गुन्ह्यात तो पाहिजे होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी मोक्का, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्स लुटीचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजा विक्री अशा स्वरूपाचे एकूण 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

आरोपी जांभुळगाव परिसरात असल्याची खात्री झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-4च्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कोणताही सुगावा लागू न देता केलेल्या या कारवाईत पोलिसांनी फरारी आरोपीला अखेर कायद्याच्या कचाट्यात आणले. ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार असवले, पोलीस हवालदार सोनटक्के आणि पोलीस शिपाई बाबाराजे मुंडे यांचा सहभाग होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *