क्राईम

लोणावळ्यातील टेबललँड परिसरातील नागरिक हैराण चोर, पाकीटमार, बेवडे व गर्दुल्यांची दहशत.पोलीस कारवाईची जोरदार मागणी


लोणावळ्यातील टेबललँड परिसरातील नागरिक हैराण
चोर, पाकीटमार, बेवडे व गर्दुल्यांची दहशत.पोलीस कारवाईची जोरदार मागणी

लोणावळा : लोणावळा शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टेबललँड परिसरात सध्या असामाजिक तत्त्वांचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे येथील नागरिक, व्यावसायिक तसेच पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत. चोर, पाकीटमार, बेवडे व गर्दुल्यांच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, तातडीने कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टेबललँड परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनाधिकृत व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या व्यवसायांच्या आडोशाने असामाजिक घटकांचा वावर वाढला असून, परिसरात चोरी, पाकीटमारी, भांडणे तसेच शिवीगाळ यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी या घटकांचा त्रास अधिक जाणवतो, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत बेवडे व गर्दुले सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करतात. महिलांना व नागरिकांना अश्लील भाषेत बोलतात, तसेच किरकोळ कारणावरून वाद घालतात. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत. काही वेळा पर्यटकांनाही या घटकांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत, ज्याचा थेट परिणाम लोणावळ्याच्या पर्यटन प्रतिमेवर होत आहे.

स्थानिक व्यावसायिकांनीही आपली व्यथा मांडली आहे. पाकीटचोर व चोरट्यांच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून, व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. दुकानात ग्राहक असतानाच पाकीटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे ग्राहक पुन्हा येण्यास कचरतात. असे एका व्यापाऱ्याने सांगितले. काही दुकानदारांनी चोरीच्या भीतीने लवकर दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोणावळा शहर पोलिसांनी टेबललँड परिसरात नियमित गस्त वाढवावी, अनाधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, तसेच संशयित व असामाजिक व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी केली आहे. वेळीच कारवाई झाली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

एकूणच टेबललँड परिसरातील वाढती असुरक्षितता ही गंभीर बाब असून, पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *