सामाजिक

गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधनाचा जागर:प्रतिष्ठित मंडळांकडून मराठी पत्रकार संघाचा सन्मान; १०० ते १२५ वर्षांच्या परंपरेला उजाळा


गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधनाचा जागर:प्रतिष्ठित मंडळांकडून मराठी पत्रकार संघाचा सन्मान; १०० ते १२५ वर्षांच्या परंपरेला उजाळा

 

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेशा पद्धतीने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांनी रंगला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी शनिवारी (ता. १९) शहरातील प्रतिष्ठित गणेश मंडळांना भेटी देत त्यांच्या विधायक उपक्रमांचे कौतुक केले. विविध मंडळांच्या वतीने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ, टोपी, गणेश प्रतिमाचिन्ह आणि तुळशीरोप देऊन सन्मान करण्यात आला.

दाभाडे सरकार राजवाडा : इतिहासाची साक्ष

सरसेनापती दाभाडे सरकार घराण्याच्या ऐतिहासिक राजवाड्यात विराजमान गौरी-गणपतीचे पत्रकार संघाने दर्शन घेतले. श्रीमंत माँसाहेब, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार आणि वहिनीसाहेब याज्ञसेनीराजे दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि उत्सवी वातावरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. अध्यक्ष अमिन खान, जिल्हा सरचिटणीस विजय सुराणा, कार्याध्यक्ष रेखा भेगडे, प्रा. विद्या अडसुळे, प्रा. योगेश घोडके, संतोष थिटे, श्रद्धा भेगडे आदी उपस्थित होते.

डोळसनाथ मंडळ : परंपरेला देखाव्याची जोड

ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरासमोरील डोळसनाथ गणेश मंडळाच्या भव्य मूर्ती व आकर्षक देखाव्याला पत्रकार संघाने भेट दिली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांचा शाल, टोपी व श्रीफळ देऊन सन्मान केला.

भेगडे तालीम : आरतीचा मान पत्रकारांना

माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भेगडे तालीम मंडळाचा गणेशोत्सव सुरू आहे. मंडळाने पत्रकार संघाचा शाल, श्रीगणेश प्रतिमाचिन्ह व श्रीफळ देऊन गौरव केला. सायंकाळच्या आरतीचा मानही पत्रकारांना देण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी, पदाधिकारी आणि भेगडे परिवारातील युवा सदस्य उपस्थित होते.

धर्मवीर मंडळ : ‘जेन झी’शी थेट संवाद

संभाजीनगर येथील धर्मवीर गणेश मंडळाचा प्रबोधनात्मक देखाव्याला भेट देण्यात आली यावेळी पत्रकार संघाला आरतीचा मान देत तुळशीरोप, शाल, टोपी व श्रीफळाने सन्मान करण्यात आला. विजय सुराणा व अमिन खान यांनी विचार व्यक्त केले. मंडळ आणि पत्रकार संघाने संयुक्तपणे सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. युवा कार्यकर्त्यांनी ‘जेन झी’ पिढीच्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या.

१२५ वर्षांची परंपरा; २४ मंडळे गोंगाटमुक्त

गाव भागातील श्री गणेश तरुण मंडळाची १०० वर्षांची, तर तेली समाज गणेश मंडळाची १२५ वर्षांची परंपरा यंदाही कायम आहे. याशिवाय पर्यावरणपूरक व गोंगाटमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या शहरातील २४ मंडळांना पत्रकार संघाने भेटी देऊन अभिनंदन केले. धार्मिक उत्सवाला सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन आणि युवा सहभागाची जोड देण्याचा मंडळांचा प्रयत्न यानिमित्ताने अधोरेखित झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *