कुस्तीच्या आखाड्यात ओंकार ठाकरची दमदार झेप; तालुकास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
कुस्तीच्या आखाड्यात ओंकार ठाकरची दमदार झेप; तालुकास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
मावळ : उर्से येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे येथील पवना विद्या मंदिर विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार सचिन ठाकर याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या ओंकारने कुस्तीच्या आखाड्यात ताकद, चपळाई, आत्मविश्वास आणि अचूक डावपेचांचा सुरेख मेळ साधत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उर्से येथील जय बजरंग तालीम, श्री पद्मावती मंदिर परिसरात झालेल्या या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला.
ओंकारने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि संयमी खेळाचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांचा अंदाज घेत योग्य वेळी केलेले डाव, चपळ हालचाली आणि ताकदीच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अखेर अंतिम लढतीतही प्रभावी कामगिरी करत त्याने प्रथम क्रमांक पटकावला.
दहावीचे शैक्षणिक वर्ष आणि कुस्तीचा सराव अशी दुहेरी कसरत करताना ओंकारने मेहनतीला पर्याय नसल्याचे सिद्ध केले आहे. नियमित सराव, शिस्त, चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे त्याच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याचे ओंकारचे यश प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
ओंकार हा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष सचिन ठाकर यांचा सुपुत्र आहे. त्याच्या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, संस्थेचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, मुख्याध्यापक शितल शेटे व पर्यवेक्षक रोशनी मराडे यांनी अभिनंदन केले.
ओंकारला कुस्तीच्या सरावासाठी शिक्षक गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनिता कळमंकर, ज्योती कोंडभर, सुप्रिया पुंडले व निकीता काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक, कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या प्रोत्साहनामुळे मिळालेल्या या यशामुळे येळसे गावासह पवना विद्या मंदिर विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मावळ तालुक्यातील सर्व सदस्यांनी ओंकारचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आगामी जिल्हास्तरीय तसेच उच्चस्तरीय स्पर्धांमध्येही ओंकारने अशीच चमकदार कामगिरी करत मावळचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली





