पत्र्याच्या शेडवर पालिकेचा हातोडा:आता ओढे-नाल्यांवरील श्रीमंत अतिक्रमणांवरही हातोडा पडणार का?घोरावाडीतील सात अनधिकृत पत्राशेड हटविले साने आळीतील रस्त्यावरील अडथळाही केला दूर नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल
पत्र्याच्या शेडवर पालिकेचा हातोडा:आता ओढे-नाल्यांवरील श्रीमंत अतिक्रमणांवरही हातोडा पडणार का?घोरावाडीतील सात अनधिकृत पत्राशेड हटविले साने आळीतील रस्त्यावरील अडथळाही केला दूर नागरिकांचा प्रशासनाला थेट सवाल
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू झाली असून, घोरावाडी स्टेशनजवळील मरीमाता मंदिर परिसरातील सात अनधिकृत पत्राशेडवर बुधवारी (दि. 7) नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. दोन जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
मरीमाता मंदिर परिसरातील नगरपरिषदेच्या जागेवर काही पत्र्याची घरे व शेड उभारण्यात आली होती. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. त्याचबरोबर साने आळी येथे रस्त्यावर उभारण्यात आलेला अडथळाही हटवून रस्ता नागरिकांसाठी पूर्ववत करण्यात आला.
या कारवाईमुळे नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी आता नागरिकांनी प्रशासनासमोर आणखी मोठा प्रश्न उभा केला आहे. गरीब नागरिकांच्या पत्र्याच्या शेडवर तातडीने कारवाई होत असेल, तर शहरातील ओढे-नाल्यांच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत संबंधितांना नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नोटिसांनंतर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ओढे-नाले बुजवून किंवा त्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
अतिक्रमण हटविताना गरिबांसाठी एक नियम आणि श्रीमंतांसाठी दुसरा नियम अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सरसकट आणि समान निकषांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पत्र्याचे शेड असो अथवा मोठ्या आर्थिक क्षमतेने उभारलेले बांधकाम अतिक्रमण असेल तर कारवाई समान असावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासन आता ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांकडे कधी वळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या कारवाईत सहाय्यक नगर रचनाकार विश्वजित कदम, आदित्य कारभारी, अजय गवांदे, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख विशाल मिंड, बांधकाम अभियंता शुभांगी हाके, शहर अभियंता राम सरगर, कल्याणी लाडे, स्मिता म्हस्के, प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, सर्व बीट अधिकारी तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
दरम्यान, नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावीत आणि अनावश्यक कटुता टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे. आता प्रशासनाच्या आवाहनासोबतच सर्व अतिक्रमणांवर समान आणि पारदर्शक कारवाई होते का, याकडे तळेगावकरांचे लक्ष लागले आहे.





