क्राईम

जादा परताव्याच्या आमिषाने मोठी फसवणूक; २१.३५ लाखांवर पाणी, अज्ञात महिलेसह टोळीवर गुन्हा दाखल


जादा परताव्याच्या आमिषाने मोठी फसवणूक; २१.३५ लाखांवर पाणी, अज्ञात महिलेसह टोळीवर गुन्हा दाखल

नवलाख उंब्रे (मावळ) :
जलद आणि जादा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल २१ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे. ‘प्रेमजी न्यूज कमिटी’ या नावाखाली गुंतवणुकीचे खोटे आश्वासन देत ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असून, अज्ञात महिला आरोपीसह संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दिलीप पांडकर (वय ४५, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी संपर्क साधून ‘प्रेमजी न्यूज कमिटी’मध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल, असा विश्वास फिर्यादींना दिला. सुरुवातीला बोलण्यात गोडवा दाखवत आरोपींनी विविध योजनांची माहिती देऊन पांडकर यांचा विश्वास संपादन केला.

दिनांक २३ जून २०२५ ते ९ जुलै २०२५ या कालावधीत आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने एकूण २१ लाख ३५ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करून घेण्यात आले. हे पैसे येस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच कोटक महिंद्रा बँक येथील वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले. गुंतवणूक केल्यानंतर ठरलेल्या कालावधीत परतावा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, ठरलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणताही आर्थिक परतावा मिळाला नाही. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष पांडकर यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या आधारे अज्ञात महिला आरोपीसह संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अशा जादा परताव्याच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *