नगरपरिषदेच्या दारातच नशेचा बाजार: लोणावळ्यातील प्रशासकीय इमारतीच्या आवारात मद्यपी चा मुक्त वावर: प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
नगरपरिषदेच्या दारातच नशेचा बाजार: लोणावळ्यातील प्रशासकीय इमारतीच्या आवारात मद्यपी चा मुक्त वावर: प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
लोणावळा : शहराच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीच्या आवारातच मद्यपी च्या मुक्त वावर सुरू असेल, तर शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल लोणावळ्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपरिषद इमारतीच्या परिसरात काही व्यक्तींकडून मद्यपान करून बिनधास्तपणे वावर केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या नगरपरिषदेकडून शहराच्या स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे आणि सार्वजनिक शिस्तीचे नियोजन अपेक्षित आहे, त्याच प्रशासकीय इमारतीच्या आवारात अशा प्रकारांना थारा मिळत असेल, तर प्रशासनाच्या दक्षतेचे करायचे तरी काय? कार्यालयाच्या आवारात मद्यपान करून वावरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आणि पोलिसांची असताना या प्रकारांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
हा काही एकटाच प्रकार नाही. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रवेशद्वारातही मद्यपी मद्यपान करून झोपल्याचे आढळून आले होते. महापुरुषांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वारालाच मद्यपींनी विश्रांतीस्थळ बनविण्याचा हा प्रकार संतापजनक होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, तरीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
एकीकडे शहराच्या विकासाच्या गप्पा आणि दुसरीकडे नगरपरिषद परिसरापासून महापुरुषांच्या स्मारकापर्यंत मद्यपींचा वावर, ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
नगरपरिषद प्रशासन आणि लोणावळा पोलिसांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या या बेशिस्तीला अभय नेमके कुणाचे, असा सवाल अनुत्तरितच राहणार आहे!





