सोमाटणे फाट्यावर एमडी ड्रग्जचा काळा बाजार: तिघांवर गुन्हा दाखल: ११.९३० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त: पोलिसांच्या कारवाया सुरू असतानाही नशेचा व्यापार थांबेना!
सोमाटणे फाट्यावर एमडी ड्रग्जचा काळा बाजार: तिघांवर गुन्हा दाखल: ११.९३० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त: पोलिसांच्या कारवाया सुरू असतानाही नशेचा व्यापार थांबेना!
शिरगाव(मावळ) : मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा परिसरात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराचे जाळे पुन्हा चर्चेत आले आहे. परंदवडी ब्रिजजवळ महामार्गालगत विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ११.९३० ग्रॅम मेफेड्रॉनसह एकूण ११ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, या कारवाईने अंमली पदार्थांच्या व्यापाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास परंदवडी ब्रिजजवळ महामार्गाच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. हर्षल गोविंदराव जाधव (वय २०, रा. डेफोडिल्स, सोमाटणे फाटा), निखिल उत्तम बेळगट (रा. सोमाटणे फाटा) आणि प्रतीक ऊर्फ सोहम ऊर्फ बाबा अंतमवान पवार (रा. काळेवाडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी कारवाया केल्या जात आहेत. छापे पडतात, मुद्देमाल जप्त होतो, संशयितांवर गुन्हे दाखल होतात; तरीही या बेकायदेशीर धंद्याला पूर्णविराम का मिळत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
पोलिसांच्या कारवाईत केवळ विक्रेतेच हाती लागत आहेत की या धंद्यामागील मोठे सूत्रधार अद्याप पडद्याआड आहेत? या व्यापाराचा मास्टरमाइंड कोण? अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो आणि या साखळीतील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ढकलणाऱ्या या अवैध व्यापाराची केवळ किरकोळ कारवाईवर बोळवण न करता संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. विक्रेत्यांपर्यंत पोहोचणारे पोलिसांचे हात या धंद्याच्या सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचणार, हा नागरिकांचा सवाल आहे.





