पाण्याची नासाडी करणाऱ्यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा दणका: दहा नळजोडण्या खंडित
पाण्याची नासाडी करणाऱ्यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा दणका: दहा नळजोडण्या खंडित
तळेगाव दाभाडे : पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना त्याची उधळपट्टी करणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देऊनही पाण्याचा अनावश्यक वापर आणि नासाडी सुरूच ठेवणाऱ्या नागरिकांच्या दहा नळजोडण्या नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत. पाणी बचतीच्या नियमांना केराची टोपली दाखविणाऱ्यांना या कारवाईतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
शहरातील यशवंत नगर, इंद्रायणी कॉलनी, टेल्को कॉलनी, जोशी वाडा तसेच गाव भागात काही नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. पाणीपुरवठा विभागाकडून यापूर्वी संबंधित नागरिकांना वारंवार सूचना देऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करून पाण्याची नासाडी सुरूच असल्याने अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई केली.
पाणी ही केवळ नागरिकांच्या दैनंदिन गरजेची बाब नसून ती सार्वजनिक आणि नैसर्गिक संपत्ती आहे. वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. एका बाजूला अनेक नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागत असताना दुसऱ्या बाजूला पिण्याचे पाणी विनाकारण वाहून देणे ही सामाजिक जाणीवेच्या अभावाची बाब ठरते.
केवळ प्रशासनाच्या कारवाईने पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार नाही, तर नागरिकांच्या सवयींमध्येही बदल होणे आवश्यक आहे. नळ उघडे न ठेवणे, गळती तातडीने दुरुस्त करणे आणि पिण्याचे पाणी वाहन धुण्यासारख्या अनावश्यक कामांसाठी वापरणे टाळणे गरजेचे आहे.
दरम्यान, यापुढेही पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून संबंधित नळजोडण्या खंडित करण्यात येतील, असा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. पाणी वाचविणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आजचा पाण्याचा थेंब वाचविला, तरच उद्याची तहान भागविता येईल.





