ढाक बहिरीच्या कातळकड्यावर मृत्यूशी झुंज:शिवदुर्ग रेस्क्यू टीमची धाडसी कामगिरी; दोन पर्यटक युवकांची रोपच्या साहाय्याने सुखरूप सुटका
ढाक बहिरीच्या कातळकड्यावर मृत्यूशी झुंज:शिवदुर्ग रेस्क्यू टीमची धाडसी कामगिरी; दोन पर्यटक युवकांची रोपच्या साहाय्याने सुखरूप सुटका
लोणावळा : सह्याद्रीच्या कातळकड्यांवर साहसाचा थरार अनुभवण्याची हौस क्षणात जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय मंगळवारी (दि. 17) ढाक बहिरीच्या दुर्गम सुळक्यावर आला. अवघड कातळभागात अडकून पडलेल्या दोन पर्यटक युवकांसमोर वर जाण्याचा मार्ग बंद आणि खाली उतरण्याची वाट अशक्य झाली होती. अशा जीवघेण्या परिस्थितीत लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत रोपच्या साहाय्याने दोघांचीही सुखरूप सुटका केली.
मावळ तालुक्यातील जांभवली गावाजवळ, कर्जत परिसरात असलेल्या ढाक बहिरीचा सुळका हा साहसी पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असला, तरी त्यावरील अवघड चढाई आणि कातळकडे मोठे आव्हान ठरतात. मंगळवारी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मदतीसाठी दूरध्वनी आला. ढाक बहिरीच्या सुळक्यावर दोन युवक अडकल्याची माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न करता बचाव साहित्याची जुळवाजुळव केली आणि घटनास्थळाकडे कूच केले.
शंतनू जोशी (वय 25) आणि साहिल तांबे (वय 24) हे दोघेही सुळक्यावरील अत्यंत अवघड ठिकाणी अडकले होते. पुढे जाणे शक्य नव्हते आणि मागे फिरण्याचाही मार्ग नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर काही सदस्यांनी जीवाची बाजी लावत दुर्गम मार्गाने चढाई करून युवकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घेत रोपच्या साहाय्याने दोन्ही युवकांना टप्प्याटप्प्याने खाली उतरविण्यात आले. सायंकाळी ही बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि दोन्ही युवकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या धाडसी बचाव मोहिमेत सचिन गायकवाड, राजेंद्र कडू, रोहित वर्तक, हर्ष तोंडे, आयुष वर्तक, महेश मसने, यश सोनवणे, आदिती गायकवाड, गणेश भांगरे, अनिकेत बोकील, गोरख कापसे, अतुल आलम आणि सुनील गायकवाड यांनी सहभाग घेतला.
सह्याद्रीच्या कडेकपारीत अडकलेल्या जीवांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या शिवदुर्गच्या या कामगिरीने पुन्हा एकदा संकटसमयी रेस्क्यू टीमचे मोल अधोरेखित केले.





