महत्त्वाचे

ठोकळवाडीच्या पाण्यावर धरणग्रस्तांचा हक्क: निर्णयाआधी संयुक्त बैठक घ्या:पिंपरी-चिंचवडला पाणी वळविण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन


ठोकळवाडीच्या पाण्यावर धरणग्रस्तांचा हक्क: निर्णयाआधी संयुक्त बैठक घ्या:पिंपरी-चिंचवडला पाणी वळविण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन

 

वडगाव मावळ : ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या त्यागावर धरण उभे राहिले, त्याच धरणातील पाणी आता दुसऱ्या शहराकडे वळविण्याचे नियोजन सुरू असेल, तर धरणग्रस्तांनी केवळ प्रेक्षक बनून राहायचे काय? धरणासाठी जमिनी दिल्या तेव्हा त्याग शेतकऱ्यांचा आणि आता पाण्याच्या नियोजनात मात्र त्यांनाच डावलायचे, हा कोणता न्याय? असा सवाल उपस्थित करीत ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समितीने पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

यासंदर्भात समितीच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले. सन 1907 पूर्वी ब्रिटिश राजवटीत ठोकरवाडी पॉवर कंपनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या पूर्वजांच्या जमिनी अत्यंत अल्प मोबदल्यात घेण्यात आल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी निवेदनातून मांडण्यात आली आहे. आंद्रा नदीवर वडेश्वर गावाजवळ असलेल्या या धरणाची शासन अभिलेखात ‘ठोकरवाडी धरण’ अशी नोंद आहे.

या धरणातील काही टीएमसी पाणी आंद्रा धरणात वळवून, तेथून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहराला पुरविण्याचे नियोजन असल्याची माहिती माध्यमांतून समोर आली आहे. मात्र, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाण्याचे नियोजन करणे अन्यायकारक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.

या प्रश्नाची अधिकृत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी आमदार सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, संबंधित प्रशासकीय अधिकारी, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीत योजनेची अधिकृत माहिती, शासन निर्णय, मंजुरी, पाणीवाटपाचे नियोजन आणि संबंधित कागदपत्रे सादर करावीत. धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असा स्पष्ट इशाराही समितीने दिला आहे.

निवेदनावर माजी सभापती शंकरराव सुपे, राजेश खांडभोर, नामदेव शेलार, शांताराम लष्करी, अंकुश अंबेकर, रामदास वाडेकर, भरत जोरी, कैलास खांडभोर, प्रकाश पिंगळे, माऊली काकडे, बाळासाहेब घाडगे, बबन आलम, रामदास आलम, काळुराम वाडेकर, सुरेश देशमुख, बाळासाहेब ठिकडे आणि विठ्ठल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *