भांगरवाडीकरांना दिलासा : इंद्रायणीवरील जुना पूल पाडून नवीन भक्कम पुलाचे बांधकाम होणार – देविदास भाऊ कडू यांचा पुढाकार
भांगरवाडीकरांना दिलासा : इंद्रायणीवरील जुना पूल पाडून नवीन भक्कम पुलाचे बांधकाम होणार – देविदास भाऊ कडू यांचा पुढाकार
लोणावळा :
भांगरवाडीला शहराशी जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील हनुमान मंदिराजवळील सुमारे ५० वर्षे जुना पूल अखेर इतिहासजमा होणार असून त्या ठिकाणी अत्याधुनिक व सुरक्षित नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान नगरसेवक श्री. देविदास भाऊसाहेब कडू यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रश्न मार्गी लागत आहे.
सदर पूल गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांच्या वाहतुकीचा प्रमुख आधार राहिला आहे. मात्र दीर्घकाळापासून अतिवृष्टी, पूरस्थिती व योग्य देखभालीअभावी पुलाच्या संरचनात्मक स्थिरतेवर गंभीर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या पाहणीनुसार पुलाचे आयुष्य संपुष्टात आले असून तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आर्थिक नुकसानासह नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.
लोणावळा शहरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता हा पूल सध्या अपुरा ठरत आहे. अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक देविदास भाऊ कडू यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन पूल उभारणीची मागणी लावून धरली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने नवीन, रुंद व मजबूत पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
नवीन पुलामुळे भांगरवाडी व शहरातील संपर्क अधिक सुलभ होणार असून वाहतूक सुरळीत होईल. तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारला जाणार आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून देविदास भाऊ कडू यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.





