महत्त्वाचेशहर

लोणावळ्यात जैवविविधतेचा ठसा ठळक; ‘शेकरू’चे अधिकृत दर्शन


लोणावळ्यात जैवविविधतेचा ठसा ठळक; ‘शेकरू’चे अधिकृत दर्शन

लोणावळा :
पुणे वनविभागातर्फे ‘अखिल भारतीय व्याघ्र अंदाज २०२६’ अंतर्गत सुरू असलेल्या वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या ‘शेकरू’चे (इंडियन जायंट स्क्विरेल) अधिकृत दर्शन नोंदविण्यात आले आहे. सोमवारी (ता. ५ जानेवारी २०२६) सकाळी सुमारे पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मौजे आतवन येथील ‘टायगर पॉइंट’ पर्यटनस्थळाच्या परिसरात ही नोंद करण्यात आली. प्राणीगणनेच्या नियमित प्रक्रियेदरम्यान झालेली ही घटना लोणावळा वनक्षेत्राच्या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, शेकरू हा प्राणी प्रामुख्याने उंच, घनदाट आणि जैवविविधतेने संपन्न जंगलांमध्येच आढळतो. उंच झाडांच्या शेंड्यावर वास्तव्य करणारा हा दुर्मीळ प्राणी बीजप्रसाराच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे त्याची उपस्थिती ही संबंधित जंगलाचा अधिवास सक्षम, संतुलित आणि पर्यावरणीयदृष्ट्या निरोगी असल्याचा सकारात्मक संकेत मानली जाते.

११ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेला ‘व्याघ्र अंदाज २०२६’ सर्वेक्षण कार्यक्रम पुणे वनविभागाच्या अखत्यारितील सर्व वनक्षेत्रांमध्ये राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणांतर्गत वाघ, बिबट्या यांसह इतर वन्यजीवांच्या उपस्थितीचा आणि अंदाजे लोकसंख्येचा अभ्यास प्राण्यांच्या पगमार्ग, विष्ठा, ओरखडे आणि प्रत्यक्ष दर्शन अशा विविध चिन्हांच्या आधारे पद्धतशीरपणे केला जात आहे.

या कार्यक्रमात केवळ मोठ्या मांसाहारी प्राण्यांवरच नव्हे, तर इतर लहान-मोठ्या वन्यजीव प्रजातींच्या नोंदींनाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. पुणे वनविभागाच्या हद्दीत शेकरूची झालेली नोंद ही स्थानिक जैवविविधता आणि अधिवासाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आशादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी मावळ परिसरातही अशाच स्वरूपाच्या नोंदी झाल्या असून, पश्चिम घाटातील जंगलांची पर्यावरणीय क्षमता अधोरेखित होते.

याबाबत माहिती देताना वनविभागाचे अधिकारी प्रकाश शिंदे म्हणाले कि शेकरू हा अत्यंत संवेदनशील आणि निवडक अधिवासातच आढळणारा प्राणी आहे. त्याचे दर्शन म्हणजे या भागातील जंगल अजूनही नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असल्याचे द्योतक आहे. अशा नोंदी वनसंवर्धनाच्या दृष्टीने आम्हाला दिशा देतात.

या घटनेमुळे लोणावळा वनक्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या या परिसराची ओळख आता महत्त्वपूर्ण वन्यजीव अधिवास म्हणूनही अधिक ठळक होत आहे. सर्वेक्षणाच्या पुढील टप्प्यांतून वन्यजीवांची स्थिती, अधिवासाची गुणवत्ता आणि एकूण वन आरोग्याबाबत अधिक सविस्तर माहिती समोर येईल, अशी अपेक्षा वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *