तळेगाव दाभाडेत आदर्श रिक्षाचालकांचा गुलाबपुष्पांनी गौरव
तळेगाव दाभाडेत आदर्श रिक्षाचालकांचा गुलाबपुष्पांनी गौरव
तळेगाव दाभाडे :
रस्त्यांवर रोज धावणाऱ्या रिक्षांचे इंजिन जितके महत्त्वाचे, तितकीच गरज आहे ती नियमपालनाच्या शिस्तीची! हीच शिस्त आणि जबाबदारी जपणाऱ्या रिक्षाचालकांचा तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने ‘दंड नव्हे, सन्मान’ ही सकारात्मक वाहतूक संस्कृती अधोरेखित केली.
मराठा क्रांती चौकातील आदर्श रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालक हे परिवहन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणात आले. वाहन चालक परवाना. वाहन कागदपत्रे, प्रवासी शिस्त, तसेच रस्ते नियमांचे भान राखत सेवा देणाऱ्या या चालकांची दखल घेत त्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य तर दिसलेच, पण नियमपालनाचा आत्मविश्वासही द्विगुणित झाला.
सदरील कार्यक्रम वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी API गणेश लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्यासोबत तळेगाव पोलीस ठाण्याचे वाघ साहेब, वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांचे कौतुक करताना अधिकाऱ्यांनी, “हे चालक म्हणजे रस्त्यावरील शिस्तीचे चालतेबोलते उदाहरण आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
API गणेश लोंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “रिक्षाचालक हा केवळ वाहनचालक नसून तो प्रवाशांचा विश्वासवाहक असतो. नियमपालन, संयम आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीवर आधारित सेवा दिल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच घटेल.” वाहतूक पोलिस व चालक यांच्यातील सहकार्य हे सुरक्षित रस्त्यांचे मूळ सूत्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम म्हणजे वाहतूक प्रशासनाची जनाभिमुख भूमिका अधोरेखित करणारा ठोस संदेश ठरला. केवळ कारवाईवर भर न देता, चांगल्या कामाची दखल घेऊन प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. सन्मानित रिक्षाचालकांनीही भविष्यात नियमपालनाची पताका उंच ठेवत, सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.





