कोट्यवधींच्या उद्योगछायेत स्मशानभूमीचा अंत! एमआयडीसीच्या कारवाईवर ग्रामस्थ संतप्त; उद्यापासून आमरण उपोषण
कोट्यवधींच्या उद्योगछायेत स्मशानभूमीचा अंत! एमआयडीसीच्या कारवाईवर ग्रामस्थ संतप्त; उद्यापासून आमरण उपोषण
नवलाख उंब्रे(मावळ)
उद्योगविकासाच्या भव्य आराखड्याखाली गावकऱ्यांच्या मूलभूत गरजांवरच घाला घातला जात असल्याचे संतापजनक वास्तव मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरात उघड झाले आहे. नवलाख उंब्रे येथील बधलवाडी आणि मिंडवाडी गावांची ग्रामपंचायत मालकीची वैकुंठ स्मशानभूमी एमआयडीसी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात पाडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातील अनेक पिढ्यांच्या अंतिम संस्कारांची साक्ष देणारी ही स्मशानभूमी अचानक पाडण्यात आल्याने ग्रामस्थांच्या भावना प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत. “उद्योग उभे राहत असताना माणसाच्या शेवटच्या प्रवासालाही जागा नाकारली जात असेल, तर हा विकास कोणासाठी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बधलवाडी, मिंडवाडी, नवलाख उंब्रे आणि आंबी परिसरातील शेतकऱ्यांनी उद्योगविस्तारासाठी हजारो एकर सुपीक जमीन एमआयडीसीला दिली. या जमिनीवर उभ्या राहिलेल्या उद्योगसाखळीमुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला, मात्र या विकासयात्रेत गावकऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. स्मशानभूमीच पाडल्याने गावात मयत झालेल्या व्यक्तींच्या अंतिमविधीसाठी जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान अलीकडेच ठाकर समाजातील एका महिलेचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने तिचे पार्थिव घराशेजारीच दफन करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून एमआयडीसी प्रशासनाची कारवाई अमानवी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
“उद्योगांसाठी आमची जमीन दिली, पण मृत्यूनंतरही गावकऱ्यांना सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची जागा मिळू नये का?” असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून थेट प्रशासनाला विचारला जात आहे. स्मशानभूमीची तात्काळ पुनर्बांधणी करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- या पार्श्वभूमीवर बधलवाडी आणि मिंडवाडी गावचे ग्रामस्थ सोमवार १६ मार्च पासून वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.





