मावळचा क्रिकेटरत्न महाराष्ट्राच्या जर्सीत.आदित्य मानेची अंडर-१४ संघात दिमाखदार निवड
मावळचा क्रिकेटरत्न महाराष्ट्राच्या जर्सीत.आदित्य मानेची अंडर-१४ संघात दिमाखदार निवड
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्याच्या क्रीडाक्षितिजावर सुवर्णाक्षरांनी नोंद घेण्यासारखी घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे येथील कु. आदित्य प्रविण माने याची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली असून, त्याने आपल्या फिरकीच्या जादूने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ आकड्यांपुरती नव्हे तर आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य यांची सांगड घालत आदित्यने ही यशाची उंच भरारी घेतली आहे.
महाराष्ट्रातील ५४ निमंत्रित संघांच्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आदित्यने ११ सामन्यांत २० डाव खेळत तब्बल ८२ गडी बाद केले. ही कामगिरी केवळ विक्रमीच नव्हे तर निवड समितीच्या नजरेत भर घालणारी ठरली. सामन्यानंतर सामना, डावामागून डाव अशी त्याची गोलंदाजी अधिकाधिक धारदार होत गेली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी तो ‘फिरकीचे कोडे’ ठरला.
या निवडीमुळे आदित्य आता गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र आणि बडोदा हे बलाढ्य संघ सहभागी होणार असून, देशातील दर्जेदार युवा खेळाडूंमध्ये स्वतःची छाप पाडण्याची मोठी संधी आदित्यसमोर आहे.
पिंपरी-चिंचवड येथील अॅंबिशिअस स्पोर्ट्स क्लबचा हा गुणवान खेळाडू मुळात फिरकी गोलंदाज आहे. स्पर्धेच्या काळात माजी रणजी खेळाडू सुनिल मुथा सर, क्रिकेट प्रशिक्षक मनिष देसाई सर आणि जयंत पानसे सर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. या तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे आदित्यच्या गोलंदाजीत तांत्रिक शिस्त, डावपेचांची समज आणि मानसिक परिपक्वता निर्माण झाली.
मावळ तालुक्यातील लेदर बॉल क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे अनिल नाईक सर यांच्याकडे आदित्यने क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पुढे गोलंदाजी प्रशिक्षक विवेक पांडे सर, तसेच अॅचिव्हर्स क्रिकेट अॅकॅडमीचे राकेश पिल्ले सर आणि प्रसाद सावंत सर यांनी त्याला अधिक प्रगल्भ प्रशिक्षण दिले. तळेगाव दाभाडे येथील स्पोर्ट्स स्पेशलिस्ट फिजिकल ट्रेनर तुषार देशप्रभू सर यांनी आदित्यच्या शारीरिक तयारीची जबाबदारी घेतल्याने त्याची फिटनेस पातळीही उल्लेखनीय ठरली आहे.
आदित्य माने हा मावळ तालुक्याचे माजी तहसीलदार रामभाऊ माने आणि तळेगाव दाभाडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांचा नातू आहे. तसेच दंतवैद्य डॉ. वर्षा माने आणि डॉ. प्रविण माने यांचा तो सुपुत्र आहे. घरातील शिस्त, संस्कार आणि क्रीडेला मिळालेली प्रोत्साहनाची पायाभरणी त्याच्या यशामागे महत्त्वाची ठरली आहे.
या निवडीमुळे तळेगाव दाभाडे शहरासह संपूर्ण मावळ तालुक्यातून आदित्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासंदर्भात बोलताना आदित्यचे वडील डॉ. प्रविण माने म्हणाले, “आदित्यने मेहनत, संयम आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेवला. हे यश त्याचे असले तरी त्यामागे त्याच्या सर्व गुरूंचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या जर्सीत खेळताना तो मावळचे नाव उज्ज्वल करेल, याचा आम्हाला अभिमान आहे.





